उपाय वाजीकरणावर | पुढारी

उपाय वाजीकरणावर

वैद्य विनायक खडीवाले

शुक्राणूक्षीणतेला वाजीकरण, दौर्बल्य, अकर्मण्यता आदी नावांनी ओळखले जाते. सर्वसामान्य परिस्थितीतील रुग्णाकरिता आस्कंदचूर्ण एक चमचा, रात्रौ दुधाबरोबर घेणे, पुरेसे आहे. ( Health )

संबंधित बातम्या 

अधिक आवश्यकता वाटल्यास आणि वजन खूप कमी असल्यास अश्वगंधापाक सकाळ-सायंकाळ दोन चमचे घ्यावा. पित्तप्रकृती व्यक्तीने च्यवनप्राश किंवा कुष्मांडपाक घ्यावा. आम्लपित्त तक्रार असणार्‍यांनी गोरखचिंचावलेह घ्यावा.

अधिक लवकर गुण पाहिजे असल्यास आणि टिकाऊ बलाकरिता चंद्रप्रभा, सुवर्णमाक्षिकादिवटी आणि शृंगभस्म प्रत्येकी तीन गोळ्या, दोन वेळा, बारीक करून घ्याव्यात, सकाळी रसायनचूर्ण आणि रात्रौ आस्कंदचूर्ण एक चमचा घ्यावे.

खूप दुबळेपणा आला असल्यास कौचपाक, वानरवट तारतम्याने घ्यावे. पोटात वायू धरण्याची तक्रार असल्यास अश्वगंधाचूर्णाऐवजी अश्वगंधारिष्ट घ्यावे. वृद्धांकरिता जोश काढा जेवणानंतर तीन चमचे योजावा. आर्थिक परिस्थिती चांगली असणार्‍यांनी धात्री रसायन दोन चमचे दोन वेळा घ्यावे. मधुमेही रुग्णांनी आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, मधुमेहवटी, सुवर्णमाक्षिकादिवटी आणि शृंगभस्म प्रत्येकी तीन गोळ्या, सकाळ, संध्याकाळ आणि यासोबत रसायन चूर्ण घ्यावे. रात्री आस्कंदचूर्ण घ्यावे. तात्कालिक उपचारासाठी रतीवल्लभ तेलाने मसाज करावा.

पोटांत वायू धरणे, अशक्तपणा, सर्दी या तक्रारी असणार्‍यांनी कच्चे लसूण खावे किंवा पुदिना, आले, लसूण अशी चटणी खावी. लसूण पाकळ्या उकळून सिद्ध दूध घ्यावे. ( Health )

या आजारामध्ये ग्रंथोक्त उपचारांमध्ये च्यवनप्राश, अश्वगंधापाक, धात्रीरसायन, मधुमालिनी वसंत, लक्ष्मी विलास, शृंग, श्रीरबलातेल किंवा शतावरीसिद्ध तेलाचा सर्वांगाला नियमित अभ्यंग असे उपाय देण्यात आले आहेत.

विशेष दक्षता आणि विहार : शुक्र धातू रस, रक्त, मेद, अस्थी, मज्जा या क्रमाने तयार होणे अधिक चांगले. त्याकरिता आहार- विहार आणि निद्रा नेमक्या वेळी असावी. शुक्रवर्धनाकरिता भरपूर दूध पिणे हा तात्पुरता उपाय राहील.

योग आणि व्यायाम : ही समस्या असणार्‍या व्यक्तींनी सकाळी पुरेसा व्यायाम करावा. पोहणे किंवा पळणे यांसारखा व्यायाम प्रभावी ठरतो. तसेच सायंकाळी मोकळ्या हवेत फिरायला जावे.

पथ्य : म्हशीचे दूध, साजूक तूप, लोणी, गव्हाची पोळी, डिंक लाडू, अळीव लाडू, मूग वा उडीद डाळ, हरभरा, साखर, मांसाहार, अंडी, बटाटा, ताळे, शिंगाडा, ओटस इत्यादी दही, गोडांबी, बदाम, सुकामेवा, लसूण.

कुपथ्य : चहा, मिरची, मीठ, ताक, आंबट पदार्थ, कदन्न, हलके धान्य, नाचणी, शिळे अन्न वर्ज्य करावे.

अन्य उपचार ः तज्ज्ञांचे देखरेखीखाली कफ प्रकृती करिता भल्लातक रसायन प्रयोग. अपान वायूच्या शोधनाकरिता निरुह आणि मात्रा बस्ती; अभ्यंग इत्यादी. निसर्गोपचारांमध्ये यासंदर्भात कोहोळा, द्राक्षे, म्हशीचे दूध, गोडांबी, मूग, उडीद, यांचा माफक वापर सुचवण्यात आला आहे.

या व्याधीसाठीचा चिकित्सा काल एक दिवस ते तीन महिने असा आहे. अपान वायूचे कार्य सुधारल्याशिवाय आणि मानसिक शांती असल्याशिवाय वाजीकर गुण मिळत नाही. याकरिता अपान वायू अनुलोमनाकरिता योग्य ते बस्ती करावे.

Back to top button