Peanut butter : पीनट बटरचे आरोग्यासाठी अनेक लाभ… | पुढारी

Peanut butter : पीनट बटरचे आरोग्यासाठी अनेक लाभ...

दक्षिण अमेरिकेत एकेकाळी भुईमुगाच्या शेंगांचे पीक घेतले जात नसे. नगदी पीक म्हणून केवळ कापसाचेच पीक घेतले जाई व त्यामुळे तेथील जमीन क्षारपड बनत चालली होती. अशावेळी महान कृषिशास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनी शेतकर्‍यांना शेंगदाण्याचे पीक घेण्याचे फायदे सांगितले तसेच शेंगदाण्यांचे वेगवेगळे उपयोगही स्पष्ट करून सांगितले. त्यापैकी एक उपयोग होता शेंगदाण्यांच्या लोण्याचा. आरोग्यासाठी हे लोणी अतिशय लाभदायक ठरते. हल्ली मखाना, पीनट बटरसारखे Peanut butter एरव्ही अनोळखी असलेले पदार्थही अनेक घरांमध्ये रुळत आहेत.

पीनट बटर Peanut butter हा अनेकांचा आवडीचा नाश्ता बनलेला आहे. हे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक मानले जाते आणि चविष्टदेखील आहे. यामुळेच भरपूर एनर्जी देणारे पीनट बटर तरुणाईची पहिली पसंती बनले आहे. पीनट बटर हे अनेक जीवनसत्त्वे, फायबर, प्रथिने, निरोगी चरबी आणि खनिजांचे भांडार आहे. हे खाल्ल्याने तुम्हाला जास्त वेळ भूक लागणार नाही. यामुळेच याच्या सेवनाने वजन कमी होते. हे रक्तातील साखर कमी करते आणि हृदयाला अनेक आजारांपासून वाचवते. पीनट बटर खाण्याचे अनेक फायदे आहेत; परंतु पीनट बटर कधी खावे हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.

साधारणपणे लोकांना नाश्त्यात ब्रेडसोबत पीनट बटर खायला आवडते; पण आयुर्वेदानुसार पीनट बटर खाण्याची ही योग्य वेळ नाही. तज्ज्ञांच्या मते, लोक सहसा सकाळी 6 ते 10 च्या दरम्यान नाश्ता करतात आणि याच वेळेत पीनट बटर खातात. परंतु, असे केल्याने कफ दोष होण्याची शक्यता असते. सकाळी तेल आणि चरबीयुक्त शेंगदाणे खाणे टाळावे. त्याऐवजी, तुम्ही ते दिवसाच्या इतर कोणत्याही जेवणात समाविष्ट केले पाहिजे. तुम्ही व्यायाम केल्यानंतरही याचा डाएटमध्ये समावेश करू शकता. पीनट बटरचे हे काही लाभ…

मधुमेहावर नियंत्रण

मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांना आरोग्यदायी गोड खाण्याची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी पीनट बटर हा पर्याय असू शकतो. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवून मधुमेहाचा धोका कमी होतो. एका संशोधनानुसार, जे लोक आठवड्यातून पाच किंवा त्याहून अधिक वेळा पीनट बटर खातात त्यांना मधुमेहाचा धोका 21 टक्क्यांनी कमी होतो.

कर्करोगाचा घटवते धोका

पीनट बटरमध्ये रेझवेराट्रोल आणि फायटोस्टेरॉलसारखे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट असतात. म्हणूनच पीनट बटर कर्करोगासारख्या धोकादायक आजाराशी लढायला मदत करते. एका अभ्यासानुसार, यामध्ये असलेली संयुगे कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका कमी करतात.

एकाग्रता वाढवते

कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आणि यासाठी पीनट बटर उपयुक्त ठरू शकते. अभ्यासानुसार, पीनट बटरमध्ये असलेले पोषक घटक एकाग्रता वाढवण्यासाठी मदत करतात.

हृदय ठेवते निरोगी

पीनट बटरमध्ये ‘ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड’ असते, जे हृदय निरोगी ठेवते. हे खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते आणि चांगले कोलेस्टेरॉल वाढवते. शेंगदाण्यामध्ये आर्जिनिन नावाचे नैसर्गिक अमिनो अ‍ॅसिड असते जे रक्तवाहिन्या मजबूत करते, ज्यामुळे हृदयातील रक्त परिसंचरण सुधारते.

Back to top button