पुरुषातील वंध्यत्व आणि आयुर्वेद उपचार | पुढारी

पुरुषातील वंध्यत्व आणि आयुर्वेद उपचार

‘गर्भधारणा न होणे म्हणजे वंध्यत्व. या समस्येमध्ये स्त्रीमधील दोषांप्रमाणे काही वेळा पुरुषांमधील दोषही कारणीभूत असतात. त्याची माहिती प्रत्येकाला असणे गरजेचे असते.

1) शुक्रजंतू उत्पत्ती प्रक्रियेतील दोष 2)शुक्रवाहिनी नलिकेमधील अडथळे 3) संभोगाच्या वेळी शुक्रजंतू गर्माशय मुखापर्यंत न पोहोचू शकणे 

4)शुक्रधातूमधील दोष

अर्थात प्रत्येकामध्ये सर्व दोष असत नाहीत; परंतु यापैकी एक जरी दोष असेल तरी संतोनोत्पत्ती होत नाही. या दोषाबद्दल थोडी अधिक माहिती असणे प्रत्येकास गरजेचे वाटते.

शुक्रजंतू उत्पन्‍न होण्याच्या प्रक्रियेतील दोष :

शिस्नाच्याखाली जे दोन अंडकोष असतात त्या जागी शुक्रजंतू तयार होत असतात. रक्‍तातील विविध स्रावांमुळे ही प्रक्रिया पार पडत असते. सर्वसाधारणपणे शुक्रजंतूची उत्पत्ती प्रक्रिया ही चौर्‍याहत्तर दिवसांची असते.त्यानंतर 10-12 दिवस त्यांचा संचय होण्याच्या जागी पोहोचण्यासाठी लागतात. म्हणजेच शुक्रजंतू तयार होऊ लागल्यानंतर सर्वसाधारणपणे 84 ते 86 दिवसांनी तो गर्भधारणेस सज्ज होतो. ही शुक्रजंतू तयार होण्याची प्रक्रिया खालील कारणांमुळे बिघडलेली शिरा फुगून राहत असतील (व्हेरीकोसील). याप्रमाणेच अतिघट्ट अंडरपँट वापरणे. गरम उष्ण जागी काम करणे, अतिस्थूलपणा (वाढलेले वजन), गालगुंडामुळे पूर्वी अंडकोषाला सूज आलेली असणे, तसेच जनन अवयवांमधील जंतू संसर्ग कुपोषण जुनाट क्षयासारखा आजार, अतिमद्यपान दीर्घकाळ अतिप्रमाणात धूम्रपान या कारणांमुळेे शुक्रजंतू तयार होण्याच्या प्रक्रियेला अडथळा येतो किंवा मंदावते. किरणांशी संपर्क, कॅन्सरसारख्या आजारात वापरली काही औषधे, रक्‍तदाब किंवा फीटचे झटके कमी करणारी औषधे, नैराश्य दूर करणारी रासायनिक औषधे यामुळेदेखील शुक्रजंतू उत्पत्ती प्रक्रिया मंदावते. 

शुक्रवाहिनी नलिकेतील अडथळा :

हार्निया किंवा हायड्रोसीलच्या ऑपरेशनच्यावेळी आघात झालेला असल्यास किंवा जंतुसंसर्गामुळे आलेल्या सुजेमुळे तयार झालेले शुक्रजंतू वहन होण्यात अडचण येते. संभोगातील दोष :

संभोग प्रक्रियेमध्ये पुरुष शिस्नातून बाहेर पडणारे शुक्र हे योनी मार्गात खोलवर फेकले जाणे गरजेचे असते. पण, इंद्रियास ताठरपणा नसल्यास किंवा आला तरीही संभोग सुरू केल्यानंतर क्षणात कमी होत असल्यास किंवा योनी मार्गात इंद्रिय प्रवेश करण्यापूर्वीचे शीघ्रपतनामुळे वीर्य बाहेरच पडत असल्यास शिस्नातील शुक्रजंतू योनीच्या आतील गर्भाशय मुखापर्यंत पोहोचतच नाहीत. काहीजणांत अतिप्रमाणात शुक्रक्षय झाला असल्यास शुक्र बाहेरही येत नाही किंवा काही थेंबच येते हादेखील दोष आढळतो.

शुक्रजंतूमधील दोष :-

शुक्रजंतूच्या संख्या एकदम कमी असणे (ऑलीगोस्पर्मिया) किंवा अजिबातच शुक्रजंतू नसल्यास (अझुस्पर्मिया) शुक्रजंतूची हालचाल (मोटीलीटी) कमी असणे, शुक्रजंतूच्या आकारातील दोष आढळतो. 

शुक्रातील दोषांबाबत –

शुक्र प्रमाणापेक्षा जास्त पातळ अथवा अतिदाट असणे, त्यामधील फ्रुक्टोजचे प्रमाण कमी असणे.

पुरुष वंध्यत्वावरील शास्त्रीय उपचार :-

हल्ली अनेक ठिकाणी गावठी पद्धतीचे मूलबाळ होण्याचे औषध दिले जाते. वंध्यत्व असलेली माणसेदेखील साहजिकच आशावादामुळे अशी औषधे घेतात. ही औषधे पुरेशी नसतात. औषधे देताना वरील कारणांचा विचार करून औषध योजना केल्यास जास्त फायदा मिळतो तसेच वरील कारणांपैकी काही बाबत शस्त्रकर्म गरजेचे असल्यास व तसा तज्ज्ञाने सल्ला दिल्यास वेळीच ते करून घ्यावे टाळाटाळ करू नये. 

1) कारणांचा उपचार :

वंध्यत्वावर उपचार करताना वरची अनेक कारणे सांगितली आहेत. त्यामुळे कारणांचा उपचार करणे महत्त्वाचे असते तो केला जातो. उदा.स्थूलपणा असल्यास वजन कमी करणारे उपचार केले जातात.
2) शुक्रवर्धक शुक्रप्रसादक औषधी योजना :

शुक्रजंतूची संख्या वाढावी तसेच नुसती संख्या न वाढता त्याचवेळी शुक्रजंतू ताकदवान व्हावा असे उपचार केले जातात.
3) वाजीकरण उपचार : शुक्रातील दोषांप्रमाणेच काहीजणांत ‘कमजोरी’ देखील जाणवत असते. लग्‍नानंतर उपचारासाठी जास्त वेळ गेला असल्यास देखील (वय जास्त असल्यास) काहींना लैंगिक कमजोरी जाणवते. अशावेळी फक्‍त वरील उपचार पुरेसे होत नाहीत, तर त्याच्याच जोडीला संभोगक्षमता, इंद्रिय प्रसरण क्षमता वाढविणारे ‘वाजीकरण’ उपचार केले जातात.
4) मैथुनासंबंधी :

अनेकवेळा रुग्णानी विविध ठिकाणी उपचार घेतले असतात, पण महिन्याच्या मासिक पाळीनंतर नक्‍की कोणत्या दिवशी संबंध करा? त्यापूर्वी कोणती पथ्ये विशेष पाळावीत? याचे मार्गदर्शन केले जाते. याचबरोबर योगासनातील काही आसनामुळे शुक्रनिर्मिती प्रक्रिया सुधारते. अशा योगासनांचे मार्गदर्शन केले जाते.
5) नियमितवेळी तपासणी :

उपचार सुरू केल्यानंतर प्रत्येक महिन्यातून 1 वेळा रुग्णाची व गरजेप्रमाणे 3-4 महिन्यांनंतर शुक्रधातूची तपासणी करून उपचाराचा आढावा घेतला जातो.त्याचप्रमाणे औषधात फेरफार केले जातात.

Back to top button