भाजप 'विजया'चा शेअर बाजारात जल्‍लोष, निफ्टी, सेन्सेक्स नव्या उच्चांकावर | पुढारी

भाजप 'विजया'चा शेअर बाजारात जल्‍लोष, निफ्टी, सेन्सेक्स नव्या उच्चांकावर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मध्‍य प्रदेश, राजस्‍थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीतील भाजपच्‍या घवघवीत यशाचे सकारात्‍मक पडसाद आज(दि. ४) शेअर बाजारामध्‍ये उमटले. आठवड्याच्‍या पहिल्‍यादिवशी बाजारात व्‍यवहार सुरु होताच जोरदार खरेदीचे संकेत मिळाले. NSE निफ्टी 50 1.64% वर 20,601.95 च्या विक्रमी उच्चांकावर तर BSE सेन्सेक्स 954.15 वर 68,435.34 वर नव्‍या उच्‍चांकावर उघडला. बँक निफ्टी निर्देशांक 857.3 अंकांनी वाढून 45,671.50 वर उघडला.

अर्थव्यवस्थेची सरस आगेकूच दर्शवणारी आकडेवारी आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून पुन्हा सुरू झालेल्या खरेदीवर खरेदीच्या जोरावर शुक्रवारी निफ्टीने 20,२९१ अंकांची सर्वकालीन उच्चांकी शिखर गाठले होते. तर सेन्सेक्स 492अंकांनी उसळी घेत 67481.19 पातळीवर स्थिरावला हाेता. 18 सप्टेंबर नंतरची निर्देशांकाची ही सर्वोच्च पातळी ठरली होती. यानंतर रविवारी चार पैकी तीन राज्‍यात भाजपने विजय मिळवला आहे. या निकालामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतील राजकीय स्‍थैर्याचे संकेत मिळत आहेत. याचा परिणाम सेन्सेक्स आणि निफ्टीने नव्‍या उच्‍चांकाला स्‍पर्श केला असून, गुंतवणुकदारांचा उत्‍साह दुणावला आहे.

Stock Market Opening Bell : बाजारात उत्‍साहाचे वातावरण

मागील आठवड्यात जीएसटी संकलनात झालेल्‍या सकारात्‍मक वाढीचे परिणामही शेअर बाजारावर दिसत आहेत. एकीकडे आर्थिक क्षेत्रातील उत्‍साही वातावरण आणि दुसरीकडे तीन राज्‍यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्‍या
आश्‍वासक विजयामुळे गुंतवणूकदारांवर सकारात्‍मक परिणाम दिसत आहे. दरम्‍यान, शुक्रवारी अमेरिकन बाजारात जोरदार वाढ झाली. मार्चमध्ये फेडच्या व्याजदर कपातीच्या अपेक्षेनुसार सोन्याने विक्रमी उच्चांक गाठला आहे.

बिटकॉइनच्‍या किंमतीत वाढ

मे 2022 नंतर लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन $40,000 पार करण्यात यशस्वी झाले. व्याजदर कपातीचे संकेत आणि एक्सचेंज ट्रेडेड फंडांकडून वाढती मागणी यामुळे बिटकॉइनमध्ये ही वाढ दिसून येत असल्‍याचे तज्‍ज्ञांचे मत आहे.

क्रूड तेलाच्‍या किंमतीत घसरण

शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किमतीत दोन टक्‍यांपर्यंत घसरण दिसून आली होती. गुरुवारी, OPEC+ देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात प्रतिदिन २२ लाख बॅरल कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबिया आणि रशियाकडून दररोज सुमारे 13 लाख बॅरलची कपात होणार आहे.

हेही वाचा :

 

 

Back to top button