अर्थज्ञान : डायरेक्ट इक्विटी की म्युच्युअल फंड? | पुढारी

अर्थज्ञान : डायरेक्ट इक्विटी की म्युच्युअल फंड?

अनिल पाटील, प्रवर्तक, एस. पी. वेल्थ, कोल्हापूर

श्रीमंत भवितव्य हवे असेल, तर पैशाला पैसा जोडला पाहिजे. जास्तीत जास्त पैसा शिल्लक ठेवून त्या पैशाला वेगाने वाढविला पाहिजे. यासाठी आपली गुंतवणूक भांडवली बाजारामध्ये करणे गरजेचे आहे. बाजारात गुंतवणूक करताना डायरेक्ट इक्विटी की इक्विटी म्युच्युअल फंडस् हा प्रश्न अनेकांना पडतो. जितकी जोखीम जास्त तितका परतावा जास्त हे समीकरण इथे असते.

सेन्सेक्सचा 1979 मध्ये 100 अंकांनी सुरू झालेला प्रवास आज 67 हजार वर पोहोचलेला आहे. या भांडवली बाजाराने सरासरी 16 टक्के परतावा दिलेला आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीत भांडवली बाजाराने बँक एफडी, सोने, चांदी, पीपीएफ, पोस्ट, विमा योजनेपेक्षा जास्त परतावा दिला आहे. देशात 142 कोटी लोकसंख्येपैकी फक्त पाच ते सहा टक्के लोकच या भांडवली बाजारामध्ये उतरले आहेत. या बाजारात गुंतवणूक करताना डायरेक्ट इक्विटी की इक्विटी म्युच्युअल फंडस् हा प्रश्न अनेकांना पडतो. जितकी जोखीम जास्त तितका परतावा जास्त हे समीकरण इथे असते. डायरेक्ट इक्विटीमध्ये जोखीम जास्त असते. कमी जोखीम घेऊन चांगला परतावा हवा असेल, तर म्युच्युअल फंड हा पर्याय चांगला ठरतो.

या भांडवली बाजारामध्ये गुंतवणूक करीत असताना चार मार्गांनी गुंतवणूक करू शकतो.
1) डायरेक्ट इक्विटी
2) इक्विटी म्युच्युअल फंड
3) आयुर्विमा कंपन्यांचे युलीप प्लॅन
4) नॅशनल पेन्शन स्कीम
वरील चार पर्यायांपैकी डायरेक्ट इक्विटी आणि इक्विटी म्युच्युअल फंड हे मुख्यतः दोनच पर्याय चांगले आहेत.

व्यावसायिक व्यवस्थापन (Professional Management)
शेअर बाजारातील नवीन गुंतवणूकदारांना सामान्यत: योग्य स्टॉक्स निवडण्याचे ज्ञान आणि अनुभव नसल्याने एखादा शेअर्स वाढत असेल , तर तो आणखी वाढेल म्हणून विकत घेतला जातो आणि खाली पडायला चालू झाला की तो अजून खाली पडेल म्हणून विकला जातो.
कोणत्याही कंपनीचा शेअर्स विकत घेताना अनेक मूलभूत आणि तांत्रिक गोष्टी पाहाव्या लागतात आणि मगच खरेदी किंवा विक्रीचा निर्णय घेतला जातो. ही बाब सर्वसामान्य गुंतवणूकदाराला जमेलच असे सांगता येत नाही. परंतु, म्युच्युअल फंडांसह तुम्हाला व्यावसायिक फंड मॅनेजरचे कौशल्य मिळते जो तुमच्या वतीने सक्रिय गुंतवणुकीचा निर्णय घेतो. महत्त्वाचे म्हणजे, हे निर्णय योजनेच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टावर आधारित आहेत. त्यामुळे तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्यासाठी तुम्हाला नियमित गुंतवणुकीचे निर्णय घेण्याची काळजी करण्याची गरज नाही.

जोखीम आणि परतावा Risk Return

भांडवली बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. ती समजावून घेऊन गुंतवणुकीबाबत दीर्घकालीन धोरण ठरविले पाहिजे. अन्यथा नुकसानीस सामोरे जावे लागते. शेअर्सच्या किमती खाली-वर होत असतात. त्यासाठी सातत्याने गुंतवणूक करणे योग्य असते. विप्रो कंपनीचा शेअर्स दोन वर्षांपूर्वी डिसेंबर 21 मध्ये 715 रुपये शेअर्स भाव होता. तो अजून वाढेल म्हणून ज्यांनी या दरात गुंतवणूक केली असेल त्यांचा निर्णय चुकलेला दिसतो. दोन वर्षांनी विप्रोचा भाव मार्च 23 मध्ये 363 पर्यंत खाली आला होता तेव्हा 50 टक्क्यांनी नुकसान झालेले दिसत होते. आज 406 रु. दर आहे. आजपासून इथून पुढे तो 90 टक्क्यांनी वाढला पाहिजे, तर आपण घेतलेल्या किमती वर पोहोचू. याचा अर्थ 715 रु. भाव येण्यासाठी अजून दोन वर्षे लागली, तर चार वर्षांत काहीच परतावा मिळणार नाही. एखादा शेअर्स खाली आला, तर परत परत खरेदी करून सरासरी मूल्य कमी करण्यासाठी परत परत गुंतवणूक केली पाहिजे. या उलट म्युच्युअल फंडात फंड मॅनेजरकडे सातत्याने गुंतवणुकीचा ओघ चालू असतो. त्यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी नेहमी पैसा येतो. त्यामुळे शेअर्स मधील जोखीम कमी करता येते व आपली गुंतवणूक अनेक शेअर्समध्ये होत असल्याने जोखीम कमी आणि चांगला परतावा म्हणून म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे वैशिष्ट्य आहे.

खर्च आणि कर (Expecses Taxes)

इक्विटीमध्ये थेट गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला स्वतःचे डीमॅट खाते आणि वेळोवेळी ट्रेडिंगची आवश्यकता भासते. स्टॉक ब्रोकर वार्षिक खाते देखभाल शुल्क, शेअर्स खरेदी विक्रीसाठी ब्रोकरेज STT (सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स) द्यावे लागते.
म्युच्युअल फंड हाऊसेस सेबीद्वारे मर्यादित असलेल्या खर्चाच्या प्रमाणात शुल्क आकारतात. डायरेक्ट इक्विटी आणि म्युच्युअल फंड दोन्ही ठिकाणी मिळणार्‍या नफ्यावर शॉर्ट-टर्म कॅपिटल गेन (STCG) आणि दीर्घकालीन भांडवली नफा (LTCG) कर लागू होतो.

मागील दोन व तीन वर्षांत एकरकमी गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना वरील प्रमाणे परतावा मिळाला आहे. सदर योजनेत एसआयपी केली, तर अजून चांगला परतावा मिळाल्याचे दिसते. वरील दोन्ही चार्टचे निरीक्षण केल्यास डायरेक्ट इक्विटीने 0 टक्के परतावा दिला, तर म्युच्युअल फंड विविध योजनांनी दोन वर्षांत सरासरी 12 टक्के, तीन वर्षांत 18 टक्के परतावा दिला आहे. याचा अर्थ डायरेक्ट इक्विटीपेक्षा म्युच्युअल फंड गुंतवणूक फारच चांगली ठरली आहे. कमी जोखीम आणि चांगला परतावा देण्यात अनेक योजना यशस्वी झाल्या आहेत.

Back to top button