Upvasacha MeduVada : संकष्टीला खिचडी खावून कंटाळलाय; बनवा उपवासाचा कुरकुरीत मेदूवडा | पुढारी

Upvasacha MeduVada : संकष्टीला खिचडी खावून कंटाळलाय; बनवा उपवासाचा कुरकुरीत मेदूवडा

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संस्कृतीत उपवासाला माेठे महत्व आहे. उपवासादिवशी खिचडी, फळे, भाजलेले शेंगदाणे, खजूर यासारख्या पदार्थाचे सेवन केले जाते. मात्र, कधी- कधी सतत उपवासाला खिचडी खाण्याचा कंटाळा येतो. अशावेळी उपवासाचा कुरकुरीत मेदूवडा बनवला तर. जाणून घेवूयात मेदूवडा  रेसीपीविषयी… ( Upvasacha MeduVada )

साहित्य-

उपवासाची वरी- १ कप
शाबूदाणा- २ चमचा
जिरे- २ चमचा
हिरवी मिरची- २
शेंगदाणे- १ कप
ओले किंवा सुखं खोबरे- २ चमचा
आलं- लहान तुकडा
मध्यम आकाराचे बटाटे- दोन
शेंगदाण्याचा कुट- अर्धा कप
दही- दोन चमचा
तेल – तळण्यासाठी
मीठ- चवीपुरते
पाणी- तीन कप, आवश्यकतेनुसार

कुरकुरीत मेदूवडा कृती-

१. पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यात एक वाटी उपवासाचे वरी किंवा तांदुळ आणि दोन चमचा शाबूदाणा घेवून रवाळ पावडर करून घ्यावी.

२. गॅसवरील कढईत एक चमचा तेल घालून तेल कडकडीत गरम करून घ्यावे.

३. तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा चमचा जिरे आणि एक हिरवी मिरची घालून परतावे.

४. दोन्ही वस्तु परतून घेतल्यानंतर मिक्सरमधील बारिक केलेली पावडर घालून चांगले हलवावे.

५. हे मिश्रण भाजल्यानंतर त्यात चवीपुरते मीठ आणि तीन कप पाणी घालावे. (पाणी घालताना पहिल्यांदा अडीच कप पाणी घालावे नंतर अर्धा कप लागेल तसा पाण्याचा वापर करावा.)

६. मिश्रणाला २- ३ मिनिटांनंतर उकळी आल्यावर झाकण ठेवून चांगले झिजू द्यावे. शिजल्यानंतर हे मिश्रण थंड होण्यास १ तासभर बाजूला ठेवावे.

७. मध्यम आकाराचे दोन बटाटे झिजवून त्याची साल काढावी.

८. थंड झालेल्या मिश्रणात किसणीच्या साहाय्याने बटाटे किसून घालावे.

९. यानंतर अर्धा वाटी भाजलेल्या शेंदगाण्याचा कुट, दोन चमचा दही घालून हे मिश्रण एकजीव करून पीठाचा गोळा तयार करावा.

१०. नंतर पाणी हाताला लावून पीठाचा छोटे- छोटे गोळे घेवून ते हाताने चपटा करावेत.

११. यानंतर गोळ्याच्या मधोमध बोटाने एक छिद्र पाडावे.

१२. यानंतर सर्व पीठाचे असे मेंदूवडे तयार करून घ्यावेत.

१३. एक कढईत तेल गरम करून त्यात हे सर्व मेंदूवडे तळून घ्यावेत.

१४, यानंतर उपवासाचे कुरकुरीत मेदूवडे तयार होतील.

उपवासाची चटणी कृती-

१. एका मिक्सरच्या भांड्यात एक कप भाजलेले शेंगदाणे, दोन चमचे ओले खोबरे, हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरे, आलं, एक कप पाणी आणि चवीनुसार मीठ घालून बारीक करून घ्यावे.

२. तुमच्या आवडीप्रमाणे चटणी पातळ किंवा घट्ट करण्यासाठी पाण्याचा वापर करू शकता.

३. एका पॅनमध्ये एक चमचा तेल घेवून त्यात एक चमचा जिरे घालून चांगली फोडणी द्यावी.

४. तयार झालेली गरमा-गरम फोडणी चटणीवर ओतून एकत्रित करावे.

५. यानंतर उपवासाची चटणी खाण्यासाठी तयार झाली आहे.

६. तयार झालेले उकुरकुरीत मेदुवडे चटाणीसोबत उपवासाच्या दिवशी खायला घ्यावे. ( Upvasacha MeduVada )

 हेही वाचा 

Back to top button