World Idli Day : इडली- इंडोनेशियातून येऊन भारतात सुखाने नांदणारी मुलगी | पुढारी

World Idli Day : इडली- इंडोनेशियातून येऊन भारतात सुखाने नांदणारी मुलगी

पुढारी ऑनलाईन डेस्क : काही पदार्थ अगदी खास असतात. ते घरात बनतात, स्ट्रीटफूड म्हणून रस्त्याच्या बाजूला मिळतात, लहान रेस्टॉरंटमध्येही बनतात आणि स्टार दर्जाच्या हॉटेलच्या मेन्यू कार्डवरही सजतात. असाच एक पदार्थ म्हणजे इडली. भारतात इडली इतका प्रसिद्ध पदार्थ दुसरा कोणताही नसेल. पण गंमत अशी आहे, की इडलीचं मूळ भारतीय नाही. हो अगदी खरं आहे, साऊथ इंडियन म्हणून प्रसिद्ध असली तरी इडलीचा शोध दक्षिण भारतीयांनीही लावलेला नाही. पण एक गोष्ट मात्र आहे, ती म्हणजे दक्षिण भारताने इडलीला परफेक्ट बनवले. (World Idli Day) आज जागतिक इडली दिन जाणून घेवूया इडलीच्या उगमाची गोष्ट.

World Idli Day : ‘इडलग्गे’,’इडारिक्का’…

खाद्यसंस्कृती आणि त्यासंबंधीचा इतिहास यांचे अभ्यासक के. टी. आचार्य यांच्या मते ८०० ते १२०० शतकात इडली भारतात आली ती आताच्या इंडोनेशियातून. त्या काळातील इंडोनेशियातील बऱ्याच भूगावर हिंदू राजे राज्य करत होते. इंडोनेशियातील खेडली हा पदार्थ इडलीच्या जवळपास जाणारा आहे. भारतीय राजांबरोबर तिथे जे आचारी होते, त्यांनी खेडलीची पाककृती शिकून ती भारतात आणली.
९२० मध्ये लिहिलेल्या कन्नड ग्रंथात ‘इडलग्गे’ या पदार्थाचा उल्लेख आहे. या ग्रंथाचे नाव ‘वद्दराधने’ असे असून तो शिवकोट आचार्य यांनी लिहिला आहे. तर ११३०मध्ये राजा सोमेश्वर तिसरा यांनी लिहिलेल्या एका संस्कृत ग्रंथात ‘इडारिक्का’ असा इडलीचा उल्लेख सापडतो.

World Idli Day
World Idli Day

पण, काही तज्ज्ञांच्या मते इडली अरबांच्याकडून भारतात आली. लिझी कोलिंगहॅम आणि गॉर्डन रामसे अरब व्यापाऱ्यांनी इडली भारतात आणली या मताचे आहेत. अरब व्यापारी भाताचे गोळे बनवून खाणे पसंद करत असे ते म्हणतात. उडदाची डाळ मिक्स करणे आणि इडलीसाठीचे पिठ आंबवणे हे मात्र नंतर सुरू झाले असावे, असे तज्ज्ञांना वाटते. इडलीचा उगम कुठलाही असला तरी आज इडली भारतातून जगभरात पोहोचली आहे. लहानशा बटण इडली, ताटी इडली, गोव्यातील सानस, मंगोलरची खोटिग्गे, तुमकुर इडली आणि मुद्दे इडली अशा किती तरी प्रकारात इडली आपली भूकही भागवते आणि चिभेचे चोचलेही पूर्ण करते.

 

हेही वाचा 

Back to top button