Hair Care Tips : केसगळती होत असेल तर 'हे' करा सोपे उपाय | पुढारी

Hair Care Tips : केसगळती होत असेल तर 'हे' करा सोपे उपाय

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्त्रियांचे सौदर्य तिच्या केसांत असते, असे म्हटले जातं. पण, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा कोणताही ऋतू असो महिला आणि पुरूषांना केस गळतीची समस्या भेडसावत असते. जास्त करून ही समस्या महिलांच्या बाबतीत सतावत असते. या समस्येनंतर अनेकजण औषधे, नवनवीन शॉम्पू आणि तेलाचा वापर करतात. केस वाढविण्यासाठी काही वेळा केमिकलयुक्त औषधांचाही वापर केला जातो. परंतु, हा प्रयोग यशस्वी होईलच असे नाही. काही वेळेस तेल, क्रीम्स आरोग्यास हानीकारण ठरते. काही वेळा केस वाढण्याऐवजी टक्कल पडण्यास सुरूवात होते. पण, या समस्येवर तुम्ही मात करू शकता. या समस्येवर घरच्याघरी काही उपाय करता आला तर कोणाला आवडणार नाही. केस गळती कमी होण्यासाठी आणि दाट केसांसाठी काही घरगुती उपाय करायला काही हरकत नाही. ( Hair Care Tips )

लाल कांद्याचा वापर

कांद्यांच्या रसात सल्फर असते जे केसांमध्ये कोलेजनचे प्रमाण वाढविण्याचे काम करते. सर्वात प्रथम एका कांद्याचं मिक्सरच्या सहाय्याने रस काढून घ्यावा. यानंतर तो रस कापसाच्या बोळाने किंवा ब्रेसने केसांना लावल्यास कोलेजनचे प्रमाण वाढते. केसांना मालिश केल्यानंतर अर्ध्या तासांनी केस स्वच्छ पाण्याने धुवावे. असे आठवड्यातून दोन वेळा केल्यास केसांची गळती कमी होवून केस वाढण्यास मदत होते.

आवळा

विटामिन सी आणि अँटीऑक्साईट हे दोन घटक आवळ्यात भरपूर प्रमाणात असतात. जे केसांसाठी खूपच फायदेशीर असते. प्रथम दोन चमचे आवळा पावडर घेऊन यात अर्धा चमचा लिबूंचा रस घालावे. यानंतर हे मिश्रण संपूर्ण केसांमध्ये लावावे आणि अर्ध्या तासांनी केस स्वच्छ पाण्याने धुवून टाकावेत. असे केल्याने केसांतील विटामिन सीचे प्रमाण वाढते आणि केस पहिल्यापेक्षा दाट होऊ लागतात.

तांदळाचे पाणी

तांदळाचे पाणी झाडांसोबत केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. कारण तांदळाच्या पाण्यात विटामिन ए, विटामिन ई आणि विटामिन सी- ६ चे घटक असते. जे केसांच्या मुळापासून त्यांना पोषण देते. यासाठी प्रथम १०- १५ मिनिटांसाठी तांदूळ पाण्यात भिजत ठेवावे. यानंतर ते पाणी गाळून घ्यावे. यानंतर १५- २० मिनिटे तांदळाचे पाणी लावून केसांना मसाज करावे. अर्ध्या तासाने केस स्वच्छ पाण्याने धुवावे. हा उपाय आठवड्यातून एकदा नक्की करावा. यामुळे तुमचे केस पहिल्यापेक्षा दाट आणि चमकदार होतील.

केसांची मालिश

रोज रात्री केसांना नारळ तेलाने केसांना मसाज केल्यास डोके शांत होण्यासोबत केस वाढण्यास उपयोग होतो. १५- २० मिनिटे तेलाने मसाज करून सकाळी स्वच्छ पाण्याने केस धुवावे. मसाज केल्याने पेशी उत्तेजित होवून केसांनादेखील रक्त पुरवठा योग्यरित्या होतो. यामुळे हळूहळू केस दाट आणि चमकदार होण्यास मदत होते.

शिकेकाई

मजबूत आणि दाट केसांसाठी खास करून शिकेकाईचा वापर केला जातो. शिकेकाई अँटीऑक्सीडंट असल्यामुळे केसांची गळती कमी होवून केसांची वाढ होण्यास मदत होते. याशिवाय शिकेकाईमुळे अकाळी केस पांढरे होत नाहीत. प्रथम दोन चमचे शिकेकाई पावडर घेवून त्यात अर्धी वाटी दही घालावे. या मिश्रणात एक चमचा आवळा पावडर घातली तरी चालेल. हे मिश्रण एकत्रित करून केसांना हलक्या हातांनी लावा. यानंतर अर्ध्या तासाने स्वच्छ पाण्याने केस धुवावे. असे केल्यास केसांची गळती कमी होवून केस वाढ होण्यास मदत होते.

मेथी

मेथीमध्ये प्रथिने आणि लोह जास्त प्रमाणात असते जे केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरत असते. दोन चमचे मेथी दाण्याची पावडर, दोन चमचे शिकेकाई पावडर आणि अंड्याचा पांढरा भाग घालून घरच्याघरी मिश्रण तयार करावे. हे मिश्रण केसांना लावून ३० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने केस धुवावे. असे केल्याने केस गळती कमी होवून केस दमकदार होण्यासोबत केस वाढण्यास फायदा होतो.

ब्राह्मी तेल

ब्राह्मी तेलात अँन्टीऑक्सीडंटचे प्रमाण असल्याने केस गळती कमी होवून नवीन केस येऊ शकतात. या तेलाचा वापर रात्री झोपण्यापूर्वी करावा आणि सकाळी केस धुवावे. वरील सर्व उपायाने केस गळती कमी होण्यास नक्की मदत होईल. ( Hair Care Tips )

हेही वाचा : 

 

Back to top button