शाश्वत शेतीसाठी… | पुढारी

शाश्वत शेतीसाठी...

जागतिक स्तरावर अन्नधान्याच्या दरातील चढउतार रोखण्यासाठी, किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी शाश्वत शेती हाच एकमेव आधार ठरू शकतो. मंदीच्या सावटातून मुक्तता करून घेताना, भूक आणि कुपोषणाशी लढताना हे तंत्र साह्यभूत ठरणार आहे. त्याबरोबर सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला खर्‍या अर्थाने मूर्त रूप द्यायचे असल्यास जैविक-परिवर्तीत अशा शाश्वत शेती ला यापुढे पर्याय असणार नाही.

मानवजातीला घास भरवणारी जमीन ही महत्वाचही वस्तू आहे. मातीत जैविक कार्बन मुबलक प्रमाणात म्हणजे 0.5 टक्के किंवा त्याहून अधिक असतो. या जिविक घटकांचे प्रमाण प्रतिहेक्टर जमिनीत एक टन एवढे असते. वातावरणातील कार्बन म्हणजेच सीओ-2 हा ह्यूमस म्हणजे शेतातील कचरा आणि बायोमासचे विघटन झाल्यामुळे तयार होतो. त्यामुळे शेतातील काडीकचरा, बायोमास, नैसर्गिक खनिजे, गायी-म्हशींचे शेण आदी गोष्टी सेंद्रिय खत म्हणून संवर्धित केल्या जाणे गरजेचे आहे. अशाप्रकारे संवर्धन केलेले नैसर्गिक खत जमिनीतील उपलब्ध पोषक घटकांचे प्रमाण वाढण्यास उपयुक्त ठरते.

जमिनीच्या जिवंतपणावरच उत्पादन आणि जमिनीची उत्पादकता अवलंबून असते. जमीन म्हणजेच माती, जीव आणि जीवाश्म, पाणी या निसर्गाच्या अनमोल देणग्या आहेत. असे घटक शेतात आणि शेताच्या परिसरात संरक्षित केल्यास ते महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे शेतजमिनीत आणि परिसरात कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके अशा विषारी रसायनांचा वापर करणे जास्तीत जास्त टाळायला हवे. या रासायनिक द्रव्यांच्या वापरामुळे जमिनीतील सजीव प्रणाली कणाकणाने नष्ट होत राहते. जिवंतपणा नष्ट झालेल्या, विषयुक्त जमिनीचा कोरडेपणा, कठीणपणा वाढत जातो आणि उत्पादकता घटत जाते.

प्रत्येक शेताच्या चहूबाजूंनी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असणे गरजेचे आहे. ज्या वनस्पतींचा वापर कीडनाशक म्हणून करता येईल, अशा कडुनिंब, महुआ, रत्नजोत, तुळशी, आयपोमिया, अकुवा, धतुरा, लसूण, मिरची, सीताफळ अशी रोपे बांधावर लावण्यास प्राधान्य द्यावे. त्यानंतर पक्षी, बेडूक, साप, घुबड अशा मित्रजीवांना संरक्षण द्यावे. निसर्गाचे संतुलन अबाधित राखण्यासाठी हे जीव खूप मदत करतात. केवळ शेतांमध्येच नव्हे तर ग्रामीण आणि शहरी भागात तसेच नैसर्गिक अधिवासांमध्येही सर्व जिवांच्या सुरक्षिततेच्या द़ृष्टीने अशा प्राण्यांना संरक्षण देणे गरजेचे आहे. ही जैवसाखळीच निसर्गाचे आणि आपले रक्षण करते. यालाच आपण जैवविविधता असे म्हणतो.

मुळे हा रोपांचा प्राण आणि पाया आहे. त्यामुळे मुळांची काळजी सर्वप्रथम घ्यायला हवी. ती आपल्या नजरेपासून दूर जमिनीच्या पोटात वाढत असतात. मरूट झोन रायजोस्फिअरफ म्हणजेच मुळांच्या आसपास प्राणवायूचा संचार होण्याची दक्षता, पाणी किंवा आर्द्रतेची उपलब्धता, जमिनीचे तापमान योग्य राखणे या बाबी जमिनीच्या पोटात मुळांचा विकास योग्य रीतीने होण्यासाठी आवश्यक असतात. त्यासाठी जमिनीत प्रोटीन हायड्रोलायसेसचा शिडकावा करणे तसेच जमिनीचे तापमान योग्य राखणे गरजेचे असते.

प्रोटीन हायड्रोलायसेस तयार करण्यासाठी शेण, डाळ, गूळ, गोमूत्र हे घटक एकत्रित करून ते कुजविले जाते. या मिश्रणामुळे जमिनीचा विषारीपणा निष्क्रिय होतो. त्यासाठी या मिश्रणाचा शिडकावा जमिनीवर आणि रोपांवर केला जातो. अंकुरणानंतर रोपे 30 ते 40 दिवसांची असताना हा शिडकावा केला जातो. हा शिडकावा रोपांचा विकास आणि जमिनीतील जैविक घटकांच्या वेगवान वाढीसाठी उपयुक्त असतो. परिणामी शत्रू जीवाणूंचा नाश करून मायक्रोफलोरा या मित्र जीवाणूंची संख्या वाढते. हे पोषक परिवर्तन स्थायी स्वरूपात आकारास आल्यानंतर ते शोषण स्वरूपात परावर्तीत होते आणि रोपांच्या मुळांमध्ये प्रवेश करते.

गव्हासारख्या पिकांच्या तसेच डाळवर्गीय पिकांच्या मुळावर मायकोरायजा ही सहजीवी बुरशी आढळून येते. या बुरशीच्या सूक्ष्मदर्शी ट्यूब मोनोकास्टची मुळे व पिकांची मुळे यांच्या ग्रंथींचा मध्यभाग पोषक घटकांची आवक-जावक होण्यास मदत करतो. हे त्रिपक्षीय साहचर्याचे उदाहरण होय. ही नैसर्गिक व्यवस्था असून, गव्हाच्या पोषणासाठी आवश्यक मानल्या गेलेल्या रासायनिक किंवा जैव खतांमधून प्राप्त होणार्‍या नायट्रोजनवरील अवलंबित्व 70 ते 80 टक्क्यांनी कमी करणारी ही व्यवस्था आहे. या नैसर्गिक रचनेचा लाभ शेतीसाठी घेतला पाहिजे. त्यासाठी गव्हात डाळवर्गीय तसेच गवतवर्गीय सहपिके घेतल्यास शेतकर्‍यांना लाभ होऊ शकतो.

माती आणि जलसंवर्धन तसेच जीवाश्म हे घटक परस्परांना अनुकूल आणि पूरक आहेत. त्यांच्या एकत्रित संवर्धनासाठी प्रत्येक शेताच्या परिसरात एक नाला तयार करण्यात येतो. तसेच छोट्या विहिरी किंवा खड्डे तयार केल्यास फायदा होतो. पाण्याचे मातीत शोषण होण्यासाठी तसेच भूगर्भातील पाणीपातळी संवर्धित होण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. जलसंवर्धनासाठी हे तंत्र अगदी साधे वाटत असले, तरी खूपच फायदेशीर आणि बहुउद्देशीय ठरते.

जमिनीच्या पोटातील पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. हा स्तर वेगाने उंचावायचा असेल तर ट्यूबवेल म्हणजेच कूपनलिकेच्या आसपास खोल रिचार्ज खड्डे तयार करावेत. तळ्यांमध्येही असे रिचार्ज खड्डे तयार करावेत. जमिनीच्या वरच्या स्तरात साठवणूक केलेल्या पाण्याची गुणवत्ता चांगली असते आणि जमिनीतील जैवघटकांच्या साह्याने जमिनीची उत्पादकता वाढविणे शक्य होते. विशेषतः मान्सूनवर अवलंबून असलेल्या शेतीच्या विकासासाठी जमिनीतील पाणी आणि जैविक घटकांचे संवर्धन अतिशय महत्त्वाचे ठरते. जैविक शेती केल्यामुळे ती लाभदायक ठरण्याबरोबरच पूरक रोजगारही उपलब्ध होतात आणि त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास करणे शक्य होते. जैविक शेतीच्या आधारे ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध झाल्यास ग्रामीण युवकही शहरात न जाता गावातील प्रदूषणमुक्त वातावरणातच राहणे पसंत करतील.

प्रस्तावित परिवर्तीत शेती किंवा जैव शेती तंत्राची उपयोगिता सिद्ध करणारे ठोस शास्त्रीय आधार आहेत. यासंबंधी झालेल्या संशोधनांचे सकारात्मक निष्कर्ष निघाले आहेत. परिवर्तीत शेती आणि पर्यावरण सुरक्षा या पुतकात याविषयीची सखोल माहिती दिलेली आहे. हा एक उपयुक्त ग्रंथ असून, त्यात तर्कशुद्ध मांडणीद्वारे परिवर्तित-जैविक शेतीचे लाभ स्पष्ट केले आहेत आणि या प्रकारची शेती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. व्यावहारिक स्वरूपात या पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. शेतीशी संबंधित प्रत्येक घटक यात विचारात घेण्यात आला आहे. शेतकरी, ग्राहक, संशोधक, विद्यार्थी, प्रशिक्षक, व्यावसायिक, नियोजनकर्ते अशा सर्वांनाच विचारात घेण्यात आले आहे.

ज्ञान आणि दक्षता हेच दुसर्‍या हरितक्रांतीचे आधारस्तंभ ठरू शकतात. सातत्याने उच्च उत्पादनाचे लक्ष्य साध्य करण्याच्या प्रयत्नात पर्यावरणाची कोणत्याही प्रकारे क्षती होऊ नये, याची दक्षता जैविक-परिवर्तीत शेतीच्या संकल्पनेत घेतली गेली आहे. हरित विकासाची ही संकल्पना असून, जागतिक स्तरावर अन्नधान्याच्या दरातील चढउतार रोखण्यासाठी, किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी शाश्वत शेती हाच एकमेव आधार ठरू शकतो. मंदीच्या सावटातून मुक्तता करून घेताना, भूक आणि कुपोषणाशी लढताना हे तंत्र साह्यभूत ठरणार आहे. त्याबरोबर सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला खर्‍या अर्थाने मूर्त रूप द्यायचे असल्यास जैविक-परिवर्तीत अशा शाश्वत शेती ला यापुढे पर्याय असणार नाही.

– विलास कदम

Back to top button