Diet and Psychology : चिप्‍स की फळे? आहार ठरवतो तुमची मानसिक अवस्‍था! | पुढारी

Diet and Psychology : चिप्‍स की फळे? आहार ठरवतो तुमची मानसिक अवस्‍था!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तुम्‍ही काय खाता यावर तुमची मानसिकता ठरते. कारण आपण जे खातो त्‍याचा थेट परिणाम आपल्‍या मानसिक आरोग्‍यावर होतो. आहार आणि मानसिकता ( Diet and Psychology) यावर झालेल्‍या नवीन संशोधनात हा निष्‍कर्ष नाेंदविण्‍यात आली आहे. ब्रिटीश जर्नल ऑफ न्‍यूट्रिशनमध्‍ये या संशोधनाबाबतचा लेख प्रकाशित झाला आहे. बटाटा चिप्‍स सारख्‍या स्‍नॅक्‍सऐवजी तुम्‍ही जर फळे खाल्‍ली तर तुमच्‍या मानसिक आरोग्‍यावर याचा सकारात्‍मक परिणाम होतो. जे अधिक प्रमाणात फळे खातात त्‍यांच्‍यात नैराश्‍य ( डिप्रेशन ) आणि चिंता करण्‍याची लक्षणे कमी होतात, असेही या नव्‍या संशोधनातील निष्‍कर्षांमध्‍ये नमूद करण्‍यात आले आहे.

आहार आणि मानसिकता यावर ॲस्‍टन विद्यापीठात संशोधन

आहार आणि मानसिक अवस्‍था यावर इंग्‍लंडमधील बर्मिंगहॅम येथील ॲस्‍टन विद्यापीठातील संशोधकांनी वर्षभर अभ्‍यास केला. एकवर्ष संशोधकांनी ४२८ प्रौढ व्‍यक्‍ती घेत असलेल्‍या आहारावर प्रश्‍नावली तयार केली. या आहारामुळे त्‍यांच्‍या मानसिक आरोग्‍यावर होणारा परिणाम तपासणे हा या संशोधनाचा मुख्‍य हेतू होता. आहाराबरोबरच व्‍यायाम आणि धूम्रपान, मद्‍यपान अशा व्‍यसनांचीही माहिती घेण्‍यात आली. संशोधनात सहभागी झालेल्‍यांनी आहार आणि मानसिकता यावरील प्रश्‍नांवर उत्तरे दिली.

Diet and Psychology : फळे खाणारे करतात सकारात्‍मक विचार

प्रश्‍नावलीतील उत्तरांचे संशोधकांनी मूल्‍यांकन केले. यामध्‍ये असे स्‍पष्‍ट झाले की, ज्‍या व्‍यक्‍तींच्‍या आहारामध्‍ये फळांचा समावेश होता त्‍यांच्‍यामध्‍ये नैराश्‍य आणि चिंता यासारख्‍या मानसिक आजारांची लक्षणे कमी दिसून आली. तर ज्‍यांनी बटाट्याच्‍या चिप्‍स सारख्‍या तेलकट आणि आरोग्‍य बिघडण्‍यास कारणीभूत घटकांचा आहारात समावेश केला त्‍यांची मानसिक अवस्‍थेमध्‍ये नैराश्‍य आणि चिंता आढळून आलीच त्‍याचबरोबर स्‍मरणशक्‍ती कमी होण्‍याच्‍या समस्‍येलाही त्‍यांना तोंड द्‍यावे लागत होते.

आहारातील सवयी बदला मानसिक आरोग्‍य सुधारा

संशोधक डॉक्‍टर निकोला जेनी टूक्‍स यांनी म्‍हटलं आहे की, “आमच्‍या संशोधनात असे आढळले की, आपण सहज बदलता येणार्‍या सवयीमुळे आपलं मानिसक आरोग्‍य सुधारु शकतो. आपण आपल्‍या आहारात बदल केला तर नकारात्‍मक विचारांऐवजी सकारात्‍मक विचार मनात येतात. त्‍यामुळे नैराश्‍याचा धोकाही कमी होतो.”

“आहारांमध्‍ये फळांचा समावेश केल्‍याने अँटिऑक्सिडंट गुणधर्मांसह पोषक तत्वांचे जास्तीत जास्त शोषण होऊ शकते. याचा थेट परिणाम हा मानसिक आरोग्‍यावर होतो. तर कुरकुरीत आणि पोषण कमी असलेले बटाटा चिप किंवा त्‍यासारखे अन्‍य पदार्थ तुमची मानसिकता बदलू शकतात. संशोधनात सहभागी झालेल्‍यांच्‍या आहारात बटाटा चिप्‍सऐवजी फळांचा समावेश केला. या बदलामुळे दिवसेंदिवस त्‍यांच्‍याा मानसिकतेमध्‍ये सकारात्‍मक बदल झाल्‍याचे निदर्शनास आल्‍याचे निकोला यांनी स्‍पष्‍ट केले.”

हेही वाचा : 

 

 

Back to top button