Pitru Paksha Tithi 2022 | पितृपक्ष : महालय श्राद्ध कधी करावे? जाणून घ्या तिथी आणि महत्व | पुढारी

Pitru Paksha Tithi 2022 | पितृपक्ष : महालय श्राद्ध कधी करावे? जाणून घ्या तिथी आणि महत्व

शनिवार दि. 10 सप्टेंबरपासून पितृ पंधरवडा तथा महालयाचा प्रारंभ सुरू झाला आहे. सर्वपित्री अमावस्या रविवार दि. 25 सप्टेंबर रोजी आहे. आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याची प्रथा भारत, चीन, पश्चिम आशिया, इराण, ग्रीस आदी अनेक देशात प्राचीन काळापासून चालत आली आहे. मानवी प्रगतीचे जे टप्पे मानले आहेत, त्यातील अगदी पहिल्याच टप्प्यापासून आदिमानवामध्ये आपल्या मृत पृर्वजाविषयी आदर भावना आणि भयभावनाही आढळत होती, असा मानव वंश शास्त्रज्ञांचा निष्कर्ष आहे. 60 हजार वर्षापूर्वी पुरलेल्या मृतांबरोबर त्याच्या आवडीच्या वस्तूही पुरण्यात आल्याचे आढळले आहे. याचा अर्थ मृतांविषयी आदिमानवी समाजात आदर होता. त्याचबरोबर मृतात्म्याने आपल्याला त्रास देऊ नये, ही भावनाही होती. (Pitru Paksha Tithi 2022)

मृत्यूनंतरही त्या व्यक्तीला अस्तित्व असते आणि मृतात्मा मानवी जीवनावर प्रभाव पाडू शकतो, अशी भावना आदिमानवापासून दृढ झाली आहे. हिंदू स्मृती पुराणात पूर्वदेव म्हणजे पितर असे म्हटलेले आहे. देवगणांपेक्षा पितृजण कनिष्ठ श्रेणीचे असतात. ते पूजेचे अधिकारी असतात, अशी श्रद्धा आहे. ऋषीपासून पितर आणि पितरांपासून देव व दानव यांची निर्मिती झाली, असे स्मृती पुराणात म्हटले आहे. या श्रद्धेतून पूर्वजाना देवत्व प्राप्त झाले.

भारताप्रमाणे अनेक देशात आणि प्राचीन संस्कृतीत पित्तरांविषयी आदर भावना व्यक्त करण्याची प्रथा परंपरा आहे.

महालय पक्ष

भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाला महालय पक्ष किंवा पितृपक्ष असे म्हणतात. हा पंधरवडा पितृकार्याला अत्यंत योग्य मानलेला आहे. कारण या पक्षात पितर पितरू लोकांतून आपल्या कुटुंबीय माणसाच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात, अशी समजूत आहे. भाद्रपद पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत रोज महालय श्राद्ध करावे, असे शास्त्रवचन आहे. ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल त्या दिवशी त्या तिथीला या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे. हे श्राद्ध पित्तृवयी-पिता, पितामह, प्रपितामह, मातृत्रयी-माता, पितामही, प्रपितामही, सापत्नमाता, मातामह, मातृपितामह, मातृप्रपितामह, पत्नी, पुत्र, कन्या, पितृष्य, मातुल, बंधू, आत्या, मावशी, बहीण, पितृष्युपुत्र, जावई, बहिणींचा मुलगा, सासरा, सासू, आचार्य, उपाध्याय, गुरु, मित्र, शिष्य या सर्वांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करायचे असते.

अपघातात मृत्यू पावलेल्यांचे महालय श्राद्ध वद्य चतुर्दशीला करण्याचा प्रघात आहे. तिला घातचतुर्दशी असे नाव आहे. सर्वपित्री अमावास्या ही सर्व पित्तरांना उद्देशून श्राद्ध करण्याची तिथी आहे. (Pitru Paksha Tithi 2022 )

 हे ही वाचा :

 

Back to top button