नुकताच बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये काही विद्यार्थ्यांना परीक्षेत निम्न, मध्यम व उच्च प्रतीचे गुण प्राप्त झाले तर काही विद्यार्थी अयशस्वी झाले. नेहमीच यशस्वी विद्यार्थ्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत असतो. त्यामुळे परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा मानसिक संघर्ष काही प्रमाणात थांबलेला दिसून येतो; परंतु प्रश्न अनुत्तरीत राहतो तो अयशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा. परीक्षेत अयशस्वी झालेल्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक प्रकारचे द्वंद्वयुद्ध चाललेले दिसून येते. या मानसिक संघर्षातून त्या विद्यार्थ्याला बाहेर काढण्यासाठी सकारात्मक मानसशास्त्राचा एक महत्वपूर्ण दृष्टीकोन किंवा विचारप्रवाह अशा विद्यार्थ्यांना मनाची उभारी देण्यासाठी मदत करत असतो तो म्हणजे स्थितिस्थापकत्व दृष्टिकोन होय. काय आहे हा स्थितिस्थापकत्व दृष्टिकोन ते आपण समजून घेणार आहोत.
अयशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांकडे घरातील व्यक्ती, मित्र व समाज यांचा नकारात्मक दृष्टिकोन निर्माण झालेला असतो. त्यांच्या मनात सतत मानसिक संघर्ष चाललेला दिसून येतो. तसेच अयशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षण, शिक्षक, कुटुंब, नातेवाईक व समाज याविषयीची एक प्रकारची नकारात्मक भावना निर्माण झालेली असते. अशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार येऊ लागतात. उदा. चिंता, भीती, औदासिन्य, ताण-तणाव, घर, गाव, समाज सोडून जाण्याचे विचार तसेच आत्महत्या करण्याचा विचार सुद्धा मनात येऊ लागतो; मग अशा परिस्थितीत काय करावे आणि काय करू नये या संदर्भात निर्णय घेता येत नाही. तसेच घरतील व समजतील व्यक्ती या विद्यार्थ्यांकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत. त्यामुळे असे विद्यार्थी घर व समाज यापासून एकांतात राहणे पसंत करतात. "स्थितिस्थापकत्व म्हणजे व्यक्तीला निर्माण झालेल्या गंभीर किंवा आव्हानात्मक घटनेनंतर उद्ध्वस्त झालेल्या शारीरिक व मानसिक आरोग्यामध्ये सुधारणा करणे होय."
एखाद्या व्यक्तीला मोठा मानसिक धक्का बसणे, आपत्तीमध्ये संसार उद् ध्वस्त होणे, अपघातात एखादा अवयव कायम स्वरूपी निकामी होणे, जवळची व प्रिय व्यक्ती गमावणे, पती-पत्नीचा घटस्फोट होणे, व्यवसायात मोठा तोटा होणे, दीर्घकालीन आजार होणे, महत्वाच्या परीक्षेत अपयश येणे या सारखी एखादी घटना व्यक्तीच्या जीवनात घडते व व्यक्ती अतिशय हतबल होते. अशा परिस्थितीत व्यक्तीला काय करावे हे सुचत नाही. अशा वेळी सकारात्मक मानसशास्त्रातील स्थितिस्थापकत्व विचारप्रवाह आपल्याला उपयोगी पडतो.
परीक्षेच्या अपयशानंतर एखाद्या विद्यार्थ्याचे शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्य धोक्यात आले असेल तर अशा विद्यार्थ्याच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्यात स्थितिस्थापकत्व दृष्टिकोनाच्या माध्यमातून सुधारणा करता येते. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना अपयश आले असेल त्या विद्यार्थ्यांनी आपले मानसिक आरोग्य खचून न देता खूप प्रयत्न करून स्वतःचा अधिक अधिक विकास केला पाहिजे. एखाद्या व्यक्तीला मोठ्या आपत्तीला किंवा गंभीर आजाराचा सामना करावा लागतो त्यावेळी अशी व्यक्ती या आपत्ती किंवा गंभीर आजारामधून बाहेर पडण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करते व त्यानंतर पूर्वीपेक्षा अधिक जास्त सक्षम होते. आपला विकास जास्त प्रमाणात करण्याचा प्रयत्न करते. उदा. डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांनी असे म्हटले आहे की, य़शस्वी व्यक्तीच्या कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो. परंतु अपयशी झालेल्या व्यक्तींच्या कथा वाचल्यामुळे व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळू शकतात. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर "स्थितिस्थापकत्व म्हणजे अपयशाकडून यशाकडे जाण्याचा एक राजमार्ग आहे."
१)समायोजन क्षमता- ज्या व्यक्तीमध्ये स्थितिस्थापकत्व हा गुण असतो अशा व्यक्ती प्राप्त परिस्थितीशी समायोजन साधण्याचा प्रयत्न करतात. उदा. एखादा गरीब मुलगा घरची परिस्थिती बेताची असतानाही काटकसरीने आपले शिक्षण चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो.
२) आशावादी दृष्टिकोन- काही व्यक्तींच्या जीवनात अनेक समस्या असतात परंतु या व्यक्तीचा समस्येकडे व जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा अत्यंत आशावादी असल्याने या व्यक्तीच्या समस्या लवकर सुटतात.
३)समाजभिमुख वर्तन- या व्यक्तींचे वर्तन नेहमी समाजभिमुख असल्याने या व्यक्तींना कठीण प्रसंगात समाजाची नेहमी मदत मिळते. त्यामुळे या व्यक्ती समस्या सोडविण्यात लवकर यशस्वी होतात.
४) अपयशाकडून यशाकडे जाणाऱ्या व्यक्ती- अशा व्यक्ती अपयशाच्या अनुभवातून काहीतरी धडा घेतात. त्यामुळे त्यांच्याकडून भूतकाळात काय चुका झाल्या आहेत त्या सुधारण्याचा प्रयत्न करतात व जीवनात यशस्वी होतात.
५) या व्यक्ती परीश्रामावार आधारित असतात- या व्यक्तींचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या व्यक्ती आपल्याला आलेल्या अपयशाबद्दल इतर व्यक्तींना किंवा नशिबाला दोष देत बसत नाही. या व्यक्ती आपल्या परिश्रमाच्या जोरावर यश प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात.
६) सकारात्मक विचार- या व्यक्तींचा स्वतः विषयी, समाजातील व्यक्तीविषयी व परिस्थिती विषयीचा विचार हा नेहमी सकारात्मक असतो. त्यामुळे या व्यक्तींना समस्या सोडविण्यासाठी जास्त परिश्रम करावे लागत नाही.
७) सामाजिक आधार- ज्यावेळी या व्यक्तींना सामाजिक आधाराची गरज निर्माण होते त्यावेळी या व्यक्ती निसंकोचपणे इतर व्यक्तींची मदत घेण्याचा प्रयत्न करतात व आपल्या समस्येतून मार्ग काढण्याचा प्रयत्न कारतात.
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास एखाद्या अपयशानंतर रडत न बसता, नशिबाला दोष न देता डोळ्यामध्ये नवीन आकांक्षा घेऊन जगण्याचा विचार करणे म्हणजे स्थितिस्थापकत्व होय. एखादी जोखीम घेण्यासाठी किंवा कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी व्यक्तीमधील कणखरपणा म्हणजे स्थितिस्थापकत्व होय. स्थितिस्थापकत्व म्हणजे आयुष्यात सर्व बाजूने अपयश आल्यानंतरही धीर सोडून न देता फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेण्याचे सामर्थ्य होय. थोडक्यात अयशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मी एकच गोष्ट सांगेन की, असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…..
प्रा. विष्णू अडसरे, मानसशास्त्र विभागप्रमुख, अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर, पुणे.