पुढारी ऑनलाईन डेस्क
देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत हळूहळू घट नोंदवण्यात येत आहे. पण मृतांचा वाढता आकडा कायम आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५० हजार ४०७ नवे रुग्ण आढळून आले. तर ८०४ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १ लाख ३६ हजार ९६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या देशात ६ लाख १० हजार ४४३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. पॉझिटिव्हिटी रेट ३.४८ टक्क्यांवर आला आहे. देशात आतापर्यंत एकूण ५ लाख ७ हजार ९८१ जणांचा बळी घेतला आहे.
याआधीच्या दिवशी देशात ५८ हजार ७७ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ६५७ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, १ लाख ५० हजार ४०७ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९७.१७ टक्क्यांवर पोहचला होता. तर, दैनंदिन कोरोना संसर्गदर ३.८९ टक्के आणि आठवड्याचा कोरोना संसर्गदर ५.७६ टक्के नोंदवण्यात आला. तीन दिवसांनी दैनंदिन कोरोना मृत्यूसंख्या १ हजारांहून खाली आहे. यापूर्वी ६ फेब्रुवारीला ८९५ कोरोनामृत्यूची नोंद घेण्यात आली होती.
दिल्लीत गेल्या दीड महिन्यांत प्रथमच शुक्रवारी कोरोना रुग्णसंख्या १ हजाराच्या खाली आली. दिवसभरात दिल्लीत ९७७ नवे रुग्ण आढळून आले. यामुळे पॉझिटिव्हिटी रेट १.७३ टक्क्यांवर आला आहे.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत १५ टक्क्यांनी घट झाली आहे. पण नवीन ६३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट होत असताना महाराष्ट्रात संपूर्ण अनलॉक जाहीर करण्याची तयारी चाललेली आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत शुक्रवारी दिले. तथापि, केंद्र सरकार आणि कोव्हिड टास्क फोर्सच्या सल्ल्यानंतरच यासंदर्भातील निर्णय जाहीर केला जाईल, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले, नुकत्याच झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत आम्ही राज्य 'अनलॉक'च नव्हे तर 'मास्क फ्री'ही करण्याबाबतची चर्चा दोन्ही अंगांनी केलेली आहे. महाराष्ट्रात लवकरच संपूर्ण अनलॉक जाहीर करण्यासाठी केंद्र आणि राज्य कोव्हिड टास्क फोर्सकडून सल्लाही मागितला गेला आहे.
कर्नाटकात कोरोनाच्या ३,९७६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तेलंगणामध्ये ७३३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. गुजरातमध्ये एका दिवसांत १,८८३ नवे रुग्ण आढळून आले असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या १२.१२ लाखांवर पोहोचली आहे.