

मंचर : पुढारी वृत्तसेवा : फदालेवाडी शिनोली (ता. आंबेगाव) येथे मुलाने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या 77 वर्षीय पित्याचा उपचारादरम्यान पुणे येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी मुलगा शरद बबन फदाले याच्यावर घोडेगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 1) रात्री साडेनऊ वाजता सुमारास फदालेवाडी शिनोली येथे मुलगा शरद बबन फदाले (वय 32) याला त्याचे वडील बबन मारुती फदाले यांनी उशिरा घरी का आलास, असे विचारले.
त्यामुळे शरद याने वडील बबन यांना हाताने मारहाण करून खाली जमिनीवर पाडून त्यांच्या छातीवर व कपाळावर गॅसच्या रिकाम्या टाकीने मारहाण केली. बबन गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान रविवारी (दि. 3) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शैला फदाले यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात मुलगा शरद फदाले यांनी फिर्याद दिल्याने पोलिसांनी आरोपी शरद फदाले याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. शरद याला घोडेगाव न्यायालयात सोमवारी (दि. 4) हजर केले असता त्यास बुधवार (दि. 6) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेचा तपास घोडेगावचे सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किशोर वागज करीत आहेत.
हेही वाचा :