

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
इंधन दरवाढ, भाज्यांचे खराब होण्याचे वाढलेले प्रमाण आणि खतांच्या वाढत्या किमती यामुळे शेतकर्यांचे बजेट कोलमडले असून, जनतेची भूक भागवणारा बळीराजा कात्रीत सापडला आहे. खतांच्या व तणनाशकांच्या दरवाढीमुळे शेती करायची कशी, असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे.
खते, तणनाशके, इंधन याची दरवाढ झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. मालाला भाव मिळणार की, नाही याची कोणतीच श्वाश्वती नाही. तसेच, उन्हामुळे शेतीमाल लवकर खराब होत आहे. महागडी खाते, तणनाशके वापरावी लागत असल्याने हातात काहीच उरत नाही, अशी अवस्था शेतकर्यांची झाली आहे.
योग्य नियोजनाने शेती करायची झाल्यास शेतकर्यांना अनेक गोष्टींची जमवाजमव करावे लागते. ट्रॅक्टरपासून ते खतांपर्यंत आणि बी-बियाणांपर्यंत खर्च करावा लागतो. सध्या सर्वच गोष्टींची दरवाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन निघाल्यावर शेतीमालाला भाव मिळाला नाही तर तोटा सहन करावा लागतो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेतीच्या कामांना वेग आला आहे, असे असताना शेतकर्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.
कोणत्या शेतीमालाला अचानक भाव येईल आणि कोणत्या मालाचा भाव जाईल हे सांगता येणे अवघड आहे. त्यामुळे कोणते पीक घ्यावे याबाबत शेतकरी चिंतेत आहेत. शेतकर्यांची अवस्था कठीण भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. तरीही शेतकर्यांची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. शेती करावी तरी तोटा होण्याची शक्यता जास्त आहे. तर, शेती नाही केल्यास खाणार काय, असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. शेती करताना पिकाला भाव मिळेल, अशी अपेक्षा असते. परंतु, बाजारात गेल्यावर अनेकदा निराशा होते. कष्टाचे योग्य पैसे हातात येत नाहीत.
– बबन कातोरे, शेतकरी
खतांची दरवाढ झाली आहे. त्यामुळे महागडी खते विकत घेऊन शेती करावी लागते. त्यामध्ये शेतीमाल बाजारात न्यायचा झाल्यास वाहतूक खर्च परवडेनासा झाला आहे. त्यामुळे हातात पैसे शिल्लक राहत नाहीत.
– शरद आंबवणे, शेतकरी