

लोणी-धामणी : पुढारी वृत्तसेवा : पावसाने खरीप हंगामात दांडी मारल्याने खरीप हंगाम कोरडा गेला. त्यानंतर रब्बी हंगाम शेतकर्यांना तारणार, असे वाटत असताना अवकाळीसह ढगाळ वातावरणाने कांदा आणि बटाटा पिकांवर रोगराईचे आक्रमण झाले. त्यामुळे शेतकरी हताश झाला असून, आता जगायचे कसे? असा सवाल मांदळेवाडी, वडगावपीर, लोणी या दुष्काळग्रस्त गावांतील शेतकरी करीत आहेत.
रब्बी हंगामात या दुष्काळग्रस्त भागात पावसाने बर्यापैकी हजेरी लावल्याने ओढे, नाले, विहिरी, विंधनविहिरीत पाणीसाठा वाढला आहे. येथील शेतकर्यांनी ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, बटाटा व इतर पिके घेण्यावर भर दिला आहे. इतर पिके व कांदा जोमात तर बटाटा पीक फुलोर्यात आले. कांदा व बटाट्याला सध्या चांगला बाजार असल्याने व दोन्ही पिके एक महिन्याच्या अंतरावर काढणीला आली असतानाच अवकाळी पावसाने गारांसह जोरदार हजेरी लावली. त्यामुळे या भागातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. दोन पैसे मिळण्याचे स्वप्न पाहणार्या शेतकर्यांचे स्वप्न यामुळे भंगले.
अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे शासनाने आदेश दिले आणि शेतकर्यांची पळापळ सुरू झाली. ही सगळी धावपळ करीत असतानाच पिके कशी तरी तग धरू लागली, तोच धुके आणि ढगाळ वातावरणाने कहर केला. कांदा-बटाटा पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव झाला. परिणामी, या भागातील शेतकर्यांसमोर संकटामागून संकटे आल्याने शेतकरी पूर्ण हतबल झाला आहे. अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळेल, पण कधी? असाही प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. 'बारा आण्याचा मसाला आणि चार आण्याची कोंबडी' अशी गत या भागातील शेतकर्यांची झाली आहे.
हेही वाचा :