भुसारी कॉलनीतील उद्यान कोमेजले; महापालिका प्रशासनाविरोधात नाराजी | पुढारी

भुसारी कॉलनीतील उद्यान कोमेजले; महापालिका प्रशासनाविरोधात नाराजी

दीपक पाटील

पौड रोड : कोथरूड येथील भुसारी कॉलनीतील (स. नं. 98) मोकळ्या जागेवर उद्यान व बाल क्रीडांगण उभारले आहे. मात्र, निधीअभावी सुशोभीकरणासह विविध कामे या ठिकाणी अद्यापही अर्धवट आहेत. या उद्यानाच्या परिसरात सध्या झाडे-झुडपे व गवत वाढले असून, कचराही साठला आहे, यामुळे परिसरात नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. माजी नगरसेविका अल्पना वरपे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे बांधकाम विकास विभागाने 2019 मध्ये या उद्यानाच्या जागेचा रितसर ताब्यात घेतला.

नागरिकांच्या मागणीनुसार या ठिकाणी उद्यान व बाल क्रीडांगण उभारण्यासाठी महापालिका प्रशासनाने लाखो रुपयांचा निधी खर्च केला. मात्र, काही कामे निधीअभावी अद्यापही अर्धवट अवस्थेत आहेत. उद्यानात लहान मुलांसाठी उभारलेल्या खेळणीची सध्या नादुरुस्त झाली असून, ओपन जीमची देखील दुरवस्था झाली आहे. या मोकळ्या जागेवर अ‍ॅम्पी थियटर उभारण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले असून, नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, त्याचीदेखील दुरवस्था झाली असून, अनेक जागी फरशा तुटल्या आहेत.

परिसरात झाडेझुडपे, गवत वाढले असून, जागोजागी राडारोडा, कचरा साचला आहे.ड्रेनेजलाइनचे पाईपदेखील अनेक दिवसांपासून या ठिकाणी पडून आहेत. या उद्यानात सध्या मद्यपींचा वावर वाढला असून, दारूच्या रिकाम्या बाटल्या स्वछतागृह व आजूबाजूच्या परिसरात पडलेल्या दिसून येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. प्रशासनाचे या उद्यानाकडे दुर्लक्ष होत असल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाचे उपायुक्त केदार वझे म्हणाले की, या उद्यानाची
पाहणी करून आवश्यक निधी उपलब्ध करण्यासाठी महापालिकेच्या मुख्य खात्याशी पत्रव्यवहार केला जाईल.

माजी लोकप्रतिनिधींनी निधी उपलब्ध करून या उद्यानाच्या विकासाचे काम केले आहे. मात्र, अद्यापही अनेक कामे अर्धवट असल्याने परिसरातील नागरिकांना या उद्यानाचा वापर करता येत नाही. महापालिकेत प्रशासकराज असल्याने या उद्यानाच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाने  या उद्यानाचा विकास करावा.

– राजाभाऊ जोरी, रहिवासी, कोथरूड

गेल्या काळात या उद्यानाच्या विकासासाठी 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र, कोरोनानंतर या उद्यानासाठी निधी उपलब्ध न झाल्याने अनेक विकासकामे अर्धवट अवस्थेत आहेत. महापालिकेकडे पाठपुरावा करूनसुद्धा दखल घेतली जात नाही. प्रशासनाने या उद्यानाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

-अल्पना वरपे, माजी नगरसेविका

हेही वाचा

Back to top button