

जत; पुढारी वृत्तसेवा : कुडनूर (ता.जत) येथे विनावापर असलेल्या जुन्या घरात हॅन्ड ग्रॅनाईट सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही स्फोटक वस्तू शाळेतील खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आली. या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक रत्नाकर नवले यांनी भेट दिली. याबाबत सांगली बॉम्बशोधक पथकास माहिती दिली. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कुडनूर येथील जिल्हा परिषद शाळेतील लहान मुले चेंडूने खेळत होती. दरम्यान चेंडू विनावापर असलेल्या जुन्या खोलीत पडला. यावेळी चेंडू आणण्यासाठी मुलांनी खोलीत प्रवेश केला. चेंडू घेत असताना त्यांना बॉम्बसारखी वस्तू दिसली. मुलांनी याबाबत नागरिकांना माहिती दिली याबाबतची माहिती पोलीस पाटील मंजुषा कदम यांनी जत पोलिसात दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक रत्नाकर नवले व पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याबाबतची माहिती सांगली येथील बॉम्बशोधक पथकास दिली. या माहितीनंतर दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान हे पथक कुडनूर येथे दाखल झाले. या पथकातील पोलीस निरीक्षक उदय पोतदार यांनी डॉग लिओ हे श्वान फिरविले. बॉम्बच्या टॅग वरती अरबी अक्षरे लिहलेली आहेत. बॉम्ब जिवंत असल्याचे सद्यस्थितीत सांगण्यात आले आहे. यापूर्वी देखील २०१७ साली दोन हॅन्ड ग्रॅनाईट बॉम्ब कुडनूर येथे सापडले होते.
सद्यस्थितीत जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेचे बांधकाम सुरु असल्याने सदाशिव तुकाराम व्हनमाने यांच्या खोल्यांमध्ये मुलांची शाळा भरते. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी खेळत होते. दोन्ही खोल्या नादुरुस्त असल्याने त्यामध्ये विद्यार्थी बसत नाहीत. बाहेरील खोल्यांमध्ये शाळा भरते आतील खोल्या बंद असल्याने त्यामध्ये कोणी जात नाही. त्या खोल्या विनावापर पडून आहेत. त्या ठिकाणी बॉम्ब ठेवला हाेता. दरवाजा मोडल्याने एका बाजूने मुले खोलीत प्रवेश केल्याने हा हॅन्ड ग्रॅनाईट बॉम्ब दिसला आहे. हे घर पोलीस खात्यातील एका व्यक्तीचे असल्याची चर्चा सुरू होती, दरम्यान अधिकारी उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते.