

बर्मिंगहॅम; वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने सर्वबाद 273 धावा जमवत ऑस्ट्रेलियाला 281 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने दिवस अखेर 3 बाद 107 धावांपर्यंत मजल मारली होती. या सामन्यात आता विजयासाठी ऑस्ट्रेलियाला आणखी 174 धावांची गरज असून त्यांचे 7 गडी बाकी आहेत. (Eng vs Aus Ashes 2023)
इंग्लंडने सोमवारी या सामन्याच्या चौथ्या दिवशी 2 बाद 28 या मागील धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरुवात केली. मात्र, त्यानंतर ऑली पोप (14), जो रुट (46) व हॅरी ब्रुक (46) ठराविक अंतराने बाद होत गेले. दिवसभरात बाद होणारा ऑली पोप पहिला फलंदाज ठरला. कमिन्सने एका भेदक यॉर्करवर पोपचा त्रिफळा उडवत त्याची खेळी संपुष्टात आणली. (Eng vs Aus Ashes 2023)
पुढे, प्रत्येकी 46 धावांचे योगदान देणार्या जो रुट व हॅरी बु्रक यांनी चौथ्या गड्यासाठी 52 धावांची भागीदारी साकारली. रुट नंतर लियॉनला पुढे सरसावत लेगसाईडकडे मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात यष्टिरक्षक कॅरेकरवी यष्टिचित झाला. कॅरेने यष्टी उद्ध्वस्त केल्यानंतर रुट आपली निराशा लपवू शकला नाही. तो बाद झाल्यानंतर चाहत्यांमध्ये सन्नाटा पसरणे साहजिकच होते. लियॉनसाठी हा दिवसभरातील पहिला बळी ठरला. (Eng vs Aus Ashes 2023)
हॅरी ब्रुक देखील लियॉनचे आणखी एक सावज ठरला. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरून परत फिरावे लागल्यानंतर रुटप्रमाणेच ब्रुकची देखील निराशा झाली. स्वीप करण्याचा त्याचा प्रयत्न चुकला आणि मिडविकेटवर तैनात लॅबुशेनने त्याचा सोपा झेल टिपला. ब्रुक बाद झाला, त्यावेळी इंग्लंडची 5 बाद 150 अशी स्थिती होती. नंतर त्यांनी सर्वबाद 273 धावांपर्यंत मजल मारली.
संक्षिप्त धावफलक
अधिक वाचा :