

कैरो : प्राचीन काळातील (Egypt) इजिप्शियन लोक मृतदेहांवर विशिष्ट प्रक्रिया करून त्यांची 'ममी' बनवत असत. त्यांच्या मृत्यूपश्चातील जीवनासाठी विविध वस्तूही दफनस्थळी ठेवत असत. आता आढळून आले आहे की, अशा ममींचे दफन करीत असताना मृत व्यक्तीचे मोठ्या आकारातील पेंटिंगही दफनस्थळी बनवले जात असे. इजिप्तमधील फिलाडेल्फिया या प्राचीन नगरीतील दफनभूमीत अशी पेंटिंग्ज आढळली असल्याचे इजिप्तच्या पर्यटन व प्राचीन वस्तूंशी संबंधित मंत्रालयाने म्हटले आहे.
कैरोपासून (Egypt) 120 किलोमीटर नैऋत्येकडे फिलाडेल्फिया हे शहर आहे. इसवी सन पूर्व 304 ते इसवी सन पूर्व 30 या टोलेमिक काळात हे शहर वसवले गेले. अलेक्झांडर द ग्रेटच्या सरदारांपैकी एक असलेल्या सरदाराच्या वंशातील फेरो त्यावेळी तिथे राज्य करीत होते. ग्रीक लोकांना हे शहर दीर्घकाळापर्यंत आपलेसे वाटत होते. अगदी रोमन लोकांनी इजिप्तचा ताबा घेतल्यावरही हे प्रेम अबाधित राहिले. तेथील प्राचीन पुरातत्त्व स्थळी करण्यात आलेल्या उत्खननात दोन पूर्णावस्थेतील ममी पेंटिंग्ज आढळून आल्या. अन्य काही अर्धवट व पूर्ण न झालेली पोर्ट्रेटस्ही आढळून आली.
संशोधक बासेम गेहाड यांनी सांगितले की, फिलाडेल्फियामध्ये या ठिकाणी दफन होणारे लोक निश्चितपणे उच्च मध्यमवर्गातील किंवा संपन्न कुळातील लोक होते. त्यामुळेच त्यांच्या नातेवाईकांना अशी मोठ्या आकाराची व महागडी पोर्ट्रेटस् बनवून घेणे शक्य होत होते. ही पोर्ट्रेटस् कदाचित इजिप्तच्या (Egypt) समुद्रकिनारी असलेल्या अलेक्झांड्रिया शहरातील कलाकारांकडून बनवून घेण्यात आलेली असावीत.
हेही वाचा :