

सांगली जिल्ह्यात ऊस दराची कोंडी आज फुटली. दत्त इंडिया कंपनीने यंदाच्या गळीत हंगामात गाळपास येणार्या उसाला एकरकमी 2821 रुपये एफआरपी देण्याची घोषणा केली. तसेच कामगारांना 19 टक्के बोनस व वसंतदादा कारखान्याच्या कामगारांची थकीत देणी 14 टक्के देण्याचे आज जाहीर करण्यात आले. (Sangli FRP)
कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी उसाला एकरकमी एफआरपी देण्याचे जाहीर करून गळीत हंगाम सुरु केला आहे. पण सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर करण्यास टाळाटाळ चालविली आहे. यासाठी स्वाभिमानीने पुढाकार घेऊन मोटारसायकल रॅली काढली होती. विविध संघटनांनी आंदोलन सुरु केले आहे. कारखानदारांवर आरोप केले जात आहेत. शेतकरी संघटना व शेतकर्यांत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
त्यामुळे ऊस दराची कोंडी निर्माण झाली होती. परंतु आज दत्त इंडिया कारखान्याने ही कोंडी फोडली. कारखान्याने आज पाचव्या गळीत हंगामाचा प्रारंभ केला. फलटण येथील श्रीकृष्ण देवस्थान टस्ट्रचे अध्यक्ष श्यामसुंदर शास्त्री महाराज, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, कंपनीचे संचालक करण रुपारेल, चेतन धारू, व्हाईस प्रेसिडंट मृत्यूजंय शिंदे, संचालक अमित पाटील, सुनील आवटी यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला.
यावेळी मृत्यूजंय शिंदे यांनी सांगितले की, शेतकर्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन कंपनीचे प्रमुख जितेंद्र धारु यांनी एकरकमी एफआरपी देण्यास सांगितले. त्यानुसार आम्ही गाळपास येणार्या उसाला प्रतिटन 2821 रुपये देणार आहे. 15 दिवसांनी ही रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर जमा केली जाईल. तसेच कामगारांना 19 टक्के बोनस देण्यात येणार आहे.
याबरोबरच वसंतदादाच्या जुन्या कामगारांची थकीत 14 टक्के रक्कम देण्यात येणार आहे. यंदाच्या हंगामात 10 लाख 51 हजार टन उसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. सभासदांना 10 किलो साखर दिली जाईल. शेतकर्यांनी कोणत्याही वजन काट्यावरून वजन करून आणावे.एक ग्रॅमचाही वजनात फरक पडणार नाही.
या वेळी चीफ फायनान्स ऑफीसर अमोल शिंदे, कामगार नेते प्रदीप शिंदे, जनरल मॅनेजर शरद मोरे, चांगदेव साळवे, भारत तावरे, शेती अधिकारी मोहन पवार, ऊस वाहतूक कंत्राटदार प्रमुख नामदेव गायकवाड, विराज बाबर, सूरज बांदल, पिनल वाघमारे, उपस्थित होते.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या निणर्याचे स्वागत केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संचालक मंडळाचा सत्कार जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी खराडे म्हणाले, वसंतदादा कारखान्याने एक चांगला निर्णय घेतला आहे. तसेच वजनाबद्दलही योग्य ती दक्षता घेण्याचे जाहीर केले आहे. वजन करून आणा, त्यात फरक आल्यास पाच लाख बक्षीस देवू, अशी घोषणा शिंदे यांनी केली आहे. याबद्दल त्यांचे कौतुक आहे. जिल्ह्यातील इतर कारखान्यांनीही एकरकमी एफआरपी तातडीने जाहीर करावी, अन्यथा संघटना तोडी बंद पाडून कारखान्यांचे गाळप थांबवेल.
यावेळी संदीप राजोबा, संजय बेले, संदीप शिरोटे, दामाजी डुबल, विशाल पाटील, हणमंत पाटील, बाळासो पाटील उपस्थित होते.\