

मुंबई; पुढारी ऑनलाईन : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) काल एका ड्रग पेडलरला अटक केली. ज्यामध्ये बॉलीवूड मधील अनेक दिग्गजांचा समावेश असल्याचे समोर येत आहे. गुप्त माहितीच्या आधारे एनसीबीने बॉलीवूड अभिनेता अरमान कोहली याच्या घरावर छापा मारला. एनसीबीने त्याच्या घरातून १ ग्रॅम हून अधिक कोकेन जप्त केल्याचे समोर येत आहे. त्याच्याकडे कोकेनची गोळी होती.
एनसीबीने आरमानच्या घरावर छापा मारला तेव्हा अभिनेता अरमान कोहली नशेच्या अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर एनसीबीने त्याला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेत एनसीबीच्या झोनल हेडक्वॉटरमध्ये नेण्यात आले.
विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा मारण्यात आला. एनसीबीने अरमानच्या घराची कसून तपासणी केली. ड्रग पेडलरशी संबंध असल्याचे समोर आल्यानंतर एनसीबीने अरमानच्या घरावर छापा मारला.
एनसीबीची टीम अरमान कोहलीशी मुंबईतील विभागीय कार्यालयात चौकशी करणार आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत छापेमारी नंतर एनसीबीने विचारलेल्या प्रश्नांना अरमानने अस्पष्ट उत्तरे दिली. त्यामुळे आम्ही त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून एनसीबीला मुंबईतील ड्रग्सशी संबंधीत माहिती मिळत आहे. यानंतर एनसीबीने एक ऑपरेशन सुरू केले.
ज्या अंतर्गत अरमान कोहलीच्या घरावर छापेमारी करण्यात आली. या प्रकरणामध्ये आणखी मोठ्या लोकांचा समावेश असल्याचा अंदाज आहे.