

मुंबई पुढारी वृत्तसेवा : घरेलू कामगार म्हणून काम करणाऱ्या आणि वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या नोंदणीकृत घरेलू कामगारांना दहा हजार रुपये मिळणार आहेत. सन्मान धन योजनेअंतर्गत दहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ राज्य शासनाच्या कामगार विभागामार्फत देणार असल्याची माहिती, कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी दिली.
'जागर मुंबईचा' या अभियानांतर्गत कामगारांसाठी चेंबूर येथे भाऊबीज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास राज्याचे कामगार मंत्री व सांगलीचे पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे, आमदार ॲड.अशिष शेलार, सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटना संस्थापक-अध्यक्ष सुभाष मराठे, नगरसेविका आशाताई मराठे आदींची उपस्थिती होती.
घरेलू कामगार हा आपल्या कुटुंबाचा भाग असतो. विभक्त कुटुंब पद्धतीत व बदलत्या जीवनशैलीमध्ये त्यांचे कुटुंबात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. यामुळेच या घरेलू कामगारांचे जीवनमान हे आर्थिक तसेच सामाजिक स्तरावर अधिक उंचावण्यासाठी शासनस्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत. यासाठी शासनाने महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाची स्थापना केली. या मंडळामार्फत नोंदणीकृत कामगारांना आर्थिक लाभ देण्यात येतो. पुढील काळात नोंदणीसाठीचे शुल्क नाममात्र करण्यात येणार असून घरेलू कामगारांसाठी ज्यांचे वय 55 वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा सर्व नोंदणीकृत कामगारांना शासनातर्फे सन्मान धन योजनेअंतर्गत 10 हजार रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
हेही वाचा