

नवी दिल्ली; जाल खंबाटा : लोकसभेच्या आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा दणदणीत विजय संपादण्याचा निर्धार भाजपने केला असून, त्याचाच एक भाग म्हणून गेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये थोड्या फरकाने गमावलेल्या 144 जागांवर विशेष मेहनत घेण्याचे पक्षाने ठरवले आहे.
गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत या 144 लोकसभा मतदारसंघांत भाजपला निसटत्या फरकाने हार पत्करावी लागली होती. तथापि, 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत या जागांवर सर्वतोपरी ताकद लावण्याची व्यूहरचना भाजपने आखली आहे. ही कल्पना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडली होती. याबाबतची रणनीती निश्चित करण्यासाठी आतापर्यंत दोन बैठका खुद्द शहा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या आहेत. बुधवारी या मालिकेतील तिसरी बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याचे कारण म्हणजे अमित शहा सध्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत गुंतले आहेत.
येत्या डिसेंबरपर्यंत या 144 लोकसभा मतदारसंघांत विविध मंत्री आणि पक्ष नेत्यांनी जाऊन तेथील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्याची सूचना शहा यांनी केली होती. त्यानुसार उत्तरेकडील राज्यांतील बहुतांश नेत्यांनी आपले अहवाल सादर केले आहेत. आता गुजरात विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर या विषयाला गती दिली जाईल, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.