

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मुंबई-भुवनेश्वर (11020) कोणार्क एक्सप्रेस आता गांजा तस्कर स्पेशल गाडी बनत असून, या गाडीत दुसऱ्यांदा 32 किलो गांजा तस्करी करताना पकडला आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या श्वान पथकातील "द्रोणा" श्वानाने ही दुसऱ्यांदा उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मागील आठवड्यात गाडीतील जनरल डब्याच्या स्वच्छतागृहाजवळ दीड किलो गांजा पकडला होता. गुरुवारी पुन्हा याच गाडीत जनरल डब्यात एका ट्रॉली बॅगमध्ये 32 किलो गांजा श्वान 'द्रोणा' आणि श्वान पथकातील आरपीएफ जवानांनी पकडला आहे.
रेल्वे सुरक्षा बलाने दिलेल्या माहितीनुसार (ट्रेन क्र. 11020) कोणार्क एक्सप्रेसच्या मागील जनरल कोच CR 216170 मध्ये 02 ट्रॉली बॅगमध्ये 2,48,056 रुपये किमतीचा 31.024 किलो गांजा पकडला.आरपीएफ उपनिरक्षक अजित कोल्हे, RPF डॉग पथक पुणे, हेड कॉन्स्टेबल सुनील होले आणि हेड कॉन्स्टेबल गणेश भोर यांच्यासह श्वान द्रोणा आणि उपनिरीक्षक प्रवेश कुमार यादव यांना रात्री पुणे रेल्वे स्थानाकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर रात्री सव्वा अकराच्या सुमारास गाडी उभी असताना जनरल कोचमध्ये सीट क्रमांक 21 खाली 1 निळ्या रंगाची ट्रॉली बॅग आढळली आणि सीट क्रमांक 41 खाली 1 लाल रंगाची ट्रॉली बॅग आढळली. अशा 2 ट्रॉली बॅगमध्ये श्वान द्रोणाच्या मदतीने गांजा असल्याचे समोर आले.
घटनेची माहिती मिळताच पुणे विभागाचे सहायक सुरक्षा आयुक्त प्रवीरकुमार दास निरीक्षक संदीप पवार व निरीक्षक बी.एस.रघुवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. सापडलेला गांजा गुन्ह्याच्या घटनास्थळी जप्ती पंचनामा आणि जप्ती यादी त्याचे काम एनडीपीएस कायद्यान्वये पुढील कारवाईसाठी जीआरपी पुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. एनडीपीएस कायदा 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास एपीआय जगताप करत आहेत.
हेही वाचा :