

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशभरात १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियानाचा दुसरा टप्पा राबवण्यात आला. याद्वारे एक कोटीहुन अधिक निवृत्तीवेतन धारकांना हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. देशातील १०० शहरांमध्ये ५०० हून अधिक ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली होती. या अभियानाचा आढावा दिल्लीत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यामध्ये केंद्र सरकारची विविध मंत्रालये आणि विभाग, निवृत्ती वेतन वितरक बँका, निवृत्ती वेतनधारक संघटनांसह सर्व भागधारकांच्या उत्तम सहभागासाठी आणि सहकार्यासाठी मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी त्यांची प्रशंशाही केली.
निवृत्तीवेतनधारकांना या अभियानाचा मोठा फायदा झाला. यासाठी मोदी सरकारने तंत्रज्ञानाचा सर्वात जास्त वापर केला. दरम्यान, यात आणखी काही उणीवा असतील त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. मात्र आमच्या सरकारमध्ये नियत होती आणि नीती होती म्हणून आम्ही हे करू शकलो. या अभियानामुळे घरी बसून निवृत्तीवेतनधारकांना जिवंत असल्याचे प्रमाणपत्र देता येते. ही सुविधा मोदी सरकारने उपलब्ध करून दिली, असेही मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यावेळी म्हणाले.
या अभियानाचा आढावा दिल्लीत सादर करण्यात आला. यावेळी संबंधित विभागांचे सचिव, प्रमुख अधिकारी, बँकांचे अधिकारी उपस्थित होते. या अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या ३८ लाखांहुन अधिक निवृत्तीवेतन धारकांना तसेच राज्य सरकाराच्या १८ लाखांहुन अधिक निवृत्तीवेतन धारक, ईपीएफओचे ५३ लाखांहून अधिक डिजिटल जीवन प्रमाणपत्र देण्यात आले. केंद्रीय निवृत्तीवेतन आणि निवृत्तिवेतनधारक कल्याण विभागाने निवृत्तीवेतन वितरक बँका, मंत्रालये तथा विभाग, ४४ पेन्शनर्स वेल्फेअर असोसिएशन, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या सहकार्याने हे अभियान राबवले गेल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
दरम्यान, डिजिटल जीवन प्रमाणपत्र देण्यासाठी मोठ्या प्रमाणात चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. डिजिटल जीवन प्रमाणपत्र ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरले. ९० वर्षांपेक्षाही अधिक वय असलेल्या निवृत्तीवेतनधारकांनी डिजिटल पद्धतीचा वापर केला.
निवृत्तीवेतन धारकांना तंत्रज्ञानाच्या दृष्ट्याने सक्षम करण्याच्या उद्देशाने, त्यांचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र देणे तसेच भविष्यात त्यांना या पद्धतीचा सुरळीतपणे वापर करता यावा, यासाठी ही प्रक्रिया त्यांना समजावून देखील देण्यात आल्याचे यावेळी सांगितले गेले. निवृत्तीवेतन वितरक बँका तसेच निवृत्तीवेतन धारक कल्याण संघटना यांनी आयोजित केलेल्या शिबिरांमध्ये तसेच त्यांच्यातर्फे वयोवृध्द, आजारी निवृत्तीवेतनधारकांना मदत करण्यासाठी घरे, रुग्णालये येथेही भेटी देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
महाराष्ट्रात ५ लाखांहुन अधिक प्रमाणपत्र प्रदान
डिजिटल जीवन प्रमाणपत्र प्रदान करण्यात महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे, महाराष्ट्रात ५ लाखांहुन अधिक डिजिटल जीवन प्रमाणपत्र देण्यात आले. महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही राज्ये आघाडीवर आहेत. तर भारतीय स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँक या बँका आघाडीवर राहिल्या. तर भारतीय स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँक या बँका आघाडीवर राहिल्या.
हेही वाचा :