संगमनेर: तीन पसार पोलिसांच्या ताब्यात; घुलेवाडीतील धनगंगा पतसंस्था अपहार प्रकरणी 19 जणांना अटक

संगमनेर: तीन पसार पोलिसांच्या ताब्यात; घुलेवाडीतील धनगंगा पतसंस्था अपहार प्रकरणी 19 जणांना अटक
Published on
Updated on

संगमनेर शहर : तालुक्यातील घुलेवाडी येथील धनगंगा बिगरशेती ग्रामीण पतसंस्थेत सुमारे 4 कोटी रुपयांचा अपहार प्रकरणी तब्बल पाच वर्षांपासून हुलकावणी देणार्‍या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, मात्र याप्रकरणी अद्याप संस्थेच्या 3 महिलांसह 6 संचालक पसार असून, पोलिस त्यांच्या शोधात आहेत.

संगमनेर शहरालगत घुलेवाडीत धनगंगा बिगरशेती ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्थेचा व्यवस्थापक सचिन कवडे याने संचालक मंडळ व सहकारी कर्मचार्‍यांशी संगनमत करुन सन 2009 ते 2017 या कालावधीत 3 कोटी 91 लाख 61 हजार 254 रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले होते.

त्यानुसार लेखा परीक्षक अजय राऊत यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी मुख्य सूत्रधार व संस्थेचा व्यवस्थापक सचिन कवडे, चेअरमन रंगनाथ काशिद, व्हाईस चेअरमन किरण जाधव, संचालक शांताराम राऊत, आनंदा पानसरे, विक्रम गुंजाळ, प्रवीण भावसार, राजेंद्र गायकवाड, भिका राम राऊत, मच्छिंद्र ढमाले, अण्णासाहेब नवले, बाळासाहेब ढमाले, अशोक पानसरे, बाबासाहेब राऊत व अलका काशिद या 14 संचालकांसह शिपाई सोमनाथ राऊत यांना अटक केली होती. संचालक महादू अरगडे, बेबी सोनवणे, सुनंदा सातपुते, सचिन काळे, नादेव घोडे, जिजाबाई पांडे यांच्यासह संस्थेचा लिपीक सचिन सुखदेव सोनवणे, लेखनिक विनायक दामोदर कांडेकर व रोखपाल शहनाज मेहबूब सय्यद हे तिघे कर्मचारी मात्र पसार झाले होते.

या अपहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन कवडे याच्यासह उर्वरीत पंधरा जणांविरोधात संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात दोषा रोपपत्र दाखल झाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी गेल्या 17 ऑक्टोबर 2017 पासून पसार असलेले तिघे पोलिसांच्या हाती लागले आहेत. संस्थेचा लिपीक सचिन सुखदेव सोनवणे, रोखपाल शहनाज मेहबूब सय्यद व लेखापाल विनायक दामोदर कांडेकर या तिघांना अटक करण्यात आली. त्यांना संगमनेर न्यायालयासमोर हजर केले असता अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश श्री. वाय. एच. अमेटा यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. धनगंगा पतसंस्था आर्थिक घोटाळाप्रकरणी 20 संचालकांसह 25 जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. आत्तापर्यंत यातील 19 जणांना अटक झाली असून, 16 जणांचा न्यायालयीन निवाडा झाला आहे.

6 संचालकांसह 3 कर्मचारी सापडेना..!

गेल्या महिन्यांत 6 मे रोजी याप्रकरणाचा निकाल लागला. व्यवस्थापक कवडे व अध्यक्ष रंगनाथ काशिद या दोघांना दहा वर्षांचा सश्रम कारावास तर अन्य 14 संचालकांना प्रत्येकी दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणी संस्थेचे शिपाई सोमनाथ राऊत यांची मात्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. या खटल्याचा निकाल लागेपर्यंत या प्रकरणात पसार असलेले सहा संचालक व तिघे कर्मचारी मात्र पोलिसांना अजुनही सापडले नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news