

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील आणखी एका मंत्र्याला अटक होणे, हा संपूर्ण प्रकार अत्यंत गंभीर आहे. एनआयए आणि ईडीने काही ऑपरेशन्स मध्यंतरीच्या काळात केले. त्यामध्ये त्यांना मोठी लिंक मिळाली, की ज्यामध्ये दाऊद इब्राहिम भारतात रियल इस्टेटच्या माध्यमातून टेरर फंडींग करतो आहे. कशा प्रकारे टेरर फंडींगचे व्यवहार मनी लॉंड्रींगच्या माध्यमातून होत आहेत, यासंदर्भात ९ ठिकाणी ईडीने सर्च केला. ते सर्व ईडीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले आहे. त्यातून अनेक लिंक बाहेर आल्या आहेत. त्यामुळे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात सांगितले. (Devendra Fadanvis)
त्यातलेच एक प्रकरण मंत्री नवाब मलिक यांच्याशी संबंधित आहे. मलिक यांनी जी काही जमीन घेतली आहे, ती बॉम्बस्फोटातील आरोपी शाह वली खान आणि सरदार पटेल, जो हसीना पारकरचा उजवा हात आहे. तो दाऊद इब्राहिमच्या या संपत्तीमध्ये हसिना पारकर ही या प्रकरणात फ्रंटमॅन म्हणून वावरत होती. मुळातच जमिनीचे जे मालक आहेत, त्यांना या व्यवहारात एक पैसाही मिळाला नाही, ईडीने सांगितले आहे.
देशाचा शत्रू असलेल्या दाऊद इब्राहिमला आर्थिक मदत केल्याने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. याचा राजकारणाशी संबंध नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा महाविकास आघाडी सरकारला घ्यावाच लागेल, असे सांगून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आणखी धक्कादायक खुलासे आपण करणार असल्याचे येथे सांगितले.
मलिकांना ईडीने तीन मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. मलिकांनी जी जमीन खरेदी केली तो पैसा थेट दाऊदकडे गेला. याच पैशातून मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्यात आले. याबाबतचे पक्के दस्तावेज आपण यापूर्वीच ईडी, सीबीआय तसेच केंद्र सरकारकडे सादर केले आहे. त्यांना ईडीने केलेली अटक राजकीय नाही.
मुळात त्यांना दाऊदची बहीण हसिना पारकर आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमिनी खरेदी करण्याची गरजच का भासली, असा सवाल फडणवीस यांनी केला. हे प्रकरण गंभीर आहे. देशाच्या सुरक्षेशी सबंधित आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षाने मलिकांना वाचवण्याचा प्रयत्न करू नये, तसेच राजकारणसुद्धा करू नये.
महाविकास आघाडी सरकारला याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावीच लागणार आहे. देशासोबत गद्दारी करणाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न केला तर भाजप शांत बसणार नाही, असाही इशारा यावेळी फडणवीस यांनी दिला.
मंत्र्यांचा राजीनामा घेणार नसतील, तर राजकारणाचा स्तर खालावेल. देशाच्या शत्रूला मदत करणारे मंत्रिमंडळात राहतात, पूर्ण सरकार त्याच्या पाठीशी उभे राहते, असा संदेश देशात जाईल, असेही फडणवीस म्हणाले.
नवाब मलिक यांना वाचवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार खोटे पुरावे आणि बयाण गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याकरिता शासकीय यंत्रणेचा वापर केला जात आहे. याची इथ्यंभूत माहिती आपणाकडे आहे. लवकरच खुलासा करणार असल्याचा इशाराही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिला.