नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : कुकडी प्रकल्पातील कालव्यांची दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी अस्तरीकरण उखडल्याने पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. यंदा पाऊस कमी असल्याने पाण्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे, परंतु अनेक ठिकाणी पाण्याची गळती होत असल्याने जलसंपदा विभाग याबाबत काय काळजी घेणार, असा प्रश्न विचारला जात आहे. कुकडी प्रकल्पाचे अंतर्गत डिंभा, पिंपळगाव जोगा, माणिकडोह, वडज, चिल्हेवाडी, पाचघर, येडगाव या धरणांचा समावेश होतो. चिल्हेवाडी, पाचघर व पिंपळगाव जोगा या धरणांचे कालवे वगळता इतर धरणांच्या कालव्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे.