बांधकाम क्षेत्रात आर्किटेक्चरला डिमांड
पुणे : आर्किटेक्चर म्हणजे 'वास्तुरचनाशास्त्र' किंवा 'स्थापत्यशास्त्र'. या शास्त्रात कला आणि विज्ञान शाखेचा संगम असतो. यात कला, कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च प्रतीची सुंदर कलाकृती तयार केली जाते. पाच वर्षे कालावधीचा बी. आर्किटेक्चर हा पदवी अभ्यासक्रम असतो. तर, एम. आर्किटेक्चर या पदव्युत्तर अभ्यासक्रमात पंधरा ते वीस विषयांत स्पेशलायझेशन उपलब्ध आहे. सध्या महानगरांमध्ये बांधकाम व्यवसाय तेजीत आहे. त्यामुळे आर्किटेक्चरला बांधकाम क्षेत्रात रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध झाल्या आहेत.
आर्किटेक्चरमधल्या करिअरसाठी बी.आर्च. हा अभ्यासक्रम महत्त्वाचा असतो. त्यात डिझाइन, आर्किटेक्चरचा इतिहास, इमारत बांधकाम आणि कॉम्प्युटर-एडेड डिझाइन आदी विषयांचा समावेश होतो. बी.आर्च. पदवी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना मास्टर ऑफ आर्किटेक्चर करता येते. हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून टिकाऊ डिझाइन किंवा शहररचना यासारख्या वास्तुकलांच्या विशिष्ट क्षेत्रांमध्ये प्रगत शिक्षण घेण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळते.
बी.आर्च. किंवा एम.आर्च. पदवी व्यतिरिक्त, ग्रीन बिल्डिंग डिझाइन किंवा बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंगमध्ये (बीआयएम) सर्टिफिकेशन कोर्सेसदेखील उपलब्ध आहेत. आर्किटेक्चर क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. इच्छुक विद्यार्थी आर्किटेक्ट, आर्किटेक्चर इंजिनिअर, इंटिरिअर डिझायनर, लँडस्केप आर्किटेक्ट, शहर नियोजक, ग्रीन बिल्डिंग कन्सल्टंट, प्रकल्प व्यवस्थापक आणि नोकरीचे इतर अनेक पर्याय निवडू शकतात. लवचिकता हा या क्षेत्रात करिअर करण्याचा मोठा फायदा आहे.
सर्जनशीलता आणि समस्या सोडवणे
आर्किटेक्चर हे एक अत्यंत सर्जनशील आणि नावीन्यपूर्ण क्षेत्र आहे. त्यासाठी क्रिटिकल थिंकिंग आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये आवश्यक असतात. या क्षेत्रातल्या व्यक्तींनी आपली सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्यांचा वापर नागरिकांचे जीवन सुधारण्यासाठी रचना आणि बांधकाम करण्यासाठी केला पाहिजे. आर्किटेक्ट्सनी इमारतीची रचना करताना कार्यक्षमता, सुरक्षितता, टिकाऊपणा आणि सौंदर्यासह अनेक घटकांचा विचार केला पाहिजे. ते जटील समस्या सोडविण्यास सक्षम असले पाहिजेत. उदाहरणार्थ, कमी बजेटमध्ये बसणारी आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यास सक्षम असलेली इमारत तयार करणे.
आर्किटेक्चरला कसा घ्याल प्रवेश ?
आर्किटेक्चरच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येते. प्रवेश परीक्षेत विद्यार्थ्यांचे आर्किटेक्चर विषयाचे ज्ञान, ड्रॉइंगचे परीक्षण केले जाते. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेता येतो. विज्ञान शाखेतून शिक्षण घेतलेला विद्यार्थी आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतात. आर्किटेक्चरचा अभ्यासक्रम 'कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर'कडून तयार केला जातो. बदलत्या काळानुसार या अभ्यासक्रमात बदल करून आता बेसिक डिझाइन, ग्राफिक डिझाइन, बिल्डिंग डिझाइन, लॅँडस्केप डिझाइन, पर्यावरणशास्त्र, कन्झर्वेशन डिझाइन आदी विषयांचा समावेश करण्यात आला
आहे.
काय आहेत करिअरच्या संधी…
आर्किटेक्चर म्हणून खासगी, सार्वजनिक आणि सरकारी अशा कोणत्याही क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअर करता येते. सार्वजनिक क्षेत्रात, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, आरोग्य यांसारख्या विभागांमध्ये आर्किटेक्चरांची मागणी कायम आहे. तसेच सरकारी क्षेत्रात, पुरातत्त्व विभाग, संरक्षण मंत्रालय, रेल्वे, स्थानिक एजन्सी, राज्य विभाग, गृहनिर्माण येथे नोकरीच्या संधी आहेत. काही वर्षांचा अनुभव मिळाल्यास सल्लागार आणि कन्स्ट्रक्टर म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी विद्यार्थ्यांना आहे.
हेही वाचा

