Raj Thackeray : अमेरिकेत मराठी शाळा सुरू होत असताना महाराष्ट्रात बंद होणे खेदाची बाब : राज ठाकरे

Raj Thackeray
Raj Thackeray
Published on
Updated on

वाशी, पुढारी वृतसेवा  : एकीकडे अमेरिकेत मराठी शाळा चालू होत असताना महाराष्ट्रातील मराठी शाळा बंद होत चालल्या आहेत, या विषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाशी येथे एका कार्यक्रमात खेद व्यक्त केला. शासनाच्या वतीने आयोजित विश्व मराठी संमेलन २०२४ या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी व्यासपीठावर मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, मराठी भाषा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर आदी मान्यवर उपस्थित होते. (Raj Thackeray)

Raj Thackeray : मी कडवट मराठी आहे

राज ठाकरे पुढे म्हणाले की, मी मराठीसाठी महाराष्ट्रात कारागृहात गेलो आहे. मी कडवट मराठी आहे. माझा कोणत्याही भाषेला विरोध नाही. असे असले तरी हिंदी ही आमची राष्ट्र भाषा नाही. कारण देशाची राष्ट्र भाषा अद्याप निश्चित झाली नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या शासकीय पत्र व्यवहारासाठी (करस्पॉंड) हिंदी भाषेचा वापर केला जात असल्याच्या मागील वक्तव्याचा ठाकरे यांनी पुन्हा उल्लेख केला. मराठी भाषा उत्तम आणि समृद्ध आहे; मात्र आज ती बाजूला करण्याचा प्रयत्न होतो ते पाहून तळपायाची आग मस्तकात जाते. आपल्याकडील शाळांमध्ये जर्मन, फ्रेंच आदी भाषा शिकवल्या जातात. तशा स्थानिक भाषा शिकण्यासाठी राज्य सरकारने येथील सर्व भाषिक शाळेमध्ये मराठी भाषा सक्तीची करावी, अशी मागणी ठाकरे यांनी यावेळी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या राज्याविषयी प्रेम वाटते. यासाठी देशातील सर्वात मोठा पुतळा गुजरात मध्ये करण्यात आला आहे. अन्य गोष्टी त्यांच्या राज्यात होत आहे. हिरे व्यापारही तिकडेच नेत आहेत. जर त्यांना त्यांच्या राज्याविषयीचे प्रेम लपवता येत नसेल, तर आम्ही आपल्या मराठी भाषा आणि राज्य या विषयीचे प्रेम का लपवतो, असा प्रश्न उपस्थित करत आपण मोदी यांच्यावर ही टीका केली नाही, असे स्पष्टीकरण ठाकरे यांनी दिले. मराठी माणसाला मुंबईत जैन सोसायटीत घर घेऊ देत नाही. हे अन्य राज्यात करून दाखवा. हे येथे का होते, तर आमचे बोटचेपे धोरण याला कारणीभूत आहे. आम्ही काय गोटे आहोत का ? कोठेही घरंगळत जाण्यासाठी, असा संताप ठाकरे यांनी व्यक्त केला. आपण यापूर्वी कोणीही समोर येऊ द्या, मराठीत बोला, असे सांगितल्यावर चित्रपट क्षेत्रातील मंडळीही मराठीत बोलू लागली आहेत. याचा अर्थ त्यांना मराठी येत होते पण बोलत नव्हते. एखाद्याला नीट मराठी बोलता आले नाही, तर त्यांना हसू नका, त्यांना सुधारा, असे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले.

दीपक केसरकर म्हणाले की, या वर्षीपासून सर्व भाषिक शाळांना मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आहे. तरुणांमध्ये मराठी भाषा टिकून रहावी, त्यांना आवड वाटावी. यासाठी मराठी युवक मंडळ स्थापन केले आहे. मराठी भवन बांधण्याचा २४९ कोटींचा प्रकल्प आहे. यासाठी शिक्षण विभागाची जागा दिली आहे. सर्व मराठी संस्था मुंबईत राहतील, मराठी भाषा विभाग कार्यरत राहील. काशीला होणाऱ्या संमेलनासाठी निधी देणार असून राज्यातील सहा विभागात मराठी भाषा संमेलन घेणार आहे. पुढे प्रत्येक जिल्ह्यात संमेलन घेण्यात येणार आहे. संत साहित्य संमेलनला निधी कायम दिला जाईल. वाई येथे मराठी विश्व कोश मंडळाची इमारत बांधण्यात येणार आहे. या वर्षीपासून विदेशात होणाऱ्या मराठी भाषा संमेलनासाठी निधिची तरतूद करण्यात येणार आहे, अशी केसरकर यांनी घोषणा केली.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news