

कोकणात येणार्या 110 जातींच्या पक्ष्यांपैकी केवळ 50 जातींच्या पक्ष्यांचेच आगमन हिवाळा सुरू होताच झाले आहे. वातावरणातील बदलामुळे पक्ष्यांची संख्या रोडावल्याचे निरीक्षण पक्षितज्ज्ञ डॉ. देशमुख यांनी नोंदवले आहे. या प्रत्येक जातीचे सुमारे 100 ते 150 पक्षी दरवर्षी येत असतात. मात्र, यंदा या प्रत्येक पक्ष्यांच्या येण्याच्या संख्येतदेखील 50 टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येत असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
दरवर्षी सैबेरियातून लडाखमार्गे कोकणात सर्वप्रथम येणारा 'युरेशन हॉबी' हा पक्षी यंदादेखील सप्टेंबरमध्ये त्याच्या नियोजित आगमन वेळीच रायगडमध्ये आला आहे. भातपिकांवरील चतूर हे त्याचे खाद्य असते. त्याचबरोबर 'ग्रेटर स्पॉटेड ईगल' अर्थात युरोपियन गरुडदेखील यंदा सप्टेंबरअखेरीस दाखल झाला असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
पक्ष्यांचे स्थलांतर ही पक्षी जीवनामधली एक विलक्षण घटना आहे. पक्षी त्यांच्या मूळ देशातील हवामान बदलामुळे तसेच पिल्लांच्या प्रशिक्षणासाठी आणि खाद्यासाठी स्थलांतर करतात.
सदासर्वकाळ अनुकूल परिस्थिती लाभण्यासाठी वसतिस्थानात नियमितपणे आणि आलटून- पालटून केलेला बदल म्हणजे स्थलांतर अशी व्याख्या लँडस्बरो थॉम्सन या शास्त्रज्ञाने केली आहे.
पक्षी स्थलांतरादरम्यान मूळ वसतिस्थान ते हिवाळी मुक्काम आणि परत मूळ वसतिस्थान असा प्रवास ते करतात. चक्रवाक पक्षी हिवाळ्यात भारताच्या दक्षिण भागात स्थलांतर करतात.
आर्क्टिक टर्न हा पक्षी सर्वात मोठे स्थलांतर करतो. तो उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव व परत उत्तर ध्रुव असा सुमारे 36,000 कि.मी.चा प्रवास एका वर्षात करतो.
दरवर्षी परदेशातून एकूण सुमारे 159 प्रजातींचे पक्षी स्थलांतर करून भारतात येतात. त्यामध्ये थापट्या, नकटा, शेंडीबदक, लालसरी, थोरले व धाकटे मराल, तरंग, गडवाल, चक्रवाक ही बदके तसेच कादंब व पट्टकादंब हे गूज येतात. चमचा, अवाक, तुतवार, शेकाट्या, कारंडव, उचाट, सोनचिलखा, कुरव असे पाणथळीचे पक्षीही येतात.
तसेच गप्पीदास, कस्तुर, शंकर, धोबी, क्रौंच या पक्ष्यांबरोबरच दलदल ससाणा, शिक्रा, कवड्या हारिण, तीसा, श्येन कुकरी, खरुची हे शिकारी पक्षीदेखील येतात.
पक्ष्यांच्या स्थलांतराबाबतच्या पक्षी अभ्यासकांच्या अभ्यासानुसार, उत्तर गोलार्धात हिवाळ्यात निर्माण होणारा खाद्याचा तुटवडा हे तेथील पक्ष्यांच्या स्थलांतराचे प्रमुख कारण आहे. पक्ष्यांच्या स्थलांतराला दिवसाच्या कालावधीतील बदल कारणीभूत होतात, असेही अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
दिवस जसा लहान अथवा मोठा होतो तसा त्याचा पक्ष्यांच्या शरीरातील पीयूष आणि पिनीअल ग्रंथींवर परिणाम होतो. त्यामुळे पक्षी अस्वस्थ होतात आणि योग्य वेळ आली की, स्थलांतराचा प्रवास सुरू करतात, असे दिसून आले आहे.
पक्ष्यांच्या स्थलांतराचे चार प्रमुख हवाई मार्ग आहेत. त्यातील पहिला मार्ग निओ आर्क्टिक – निओ ट्रॉपिकल हवाई मार्ग – पक्ष्यांचे स्थलांतर उत्तर आणि दक्षिण अमेरिकेदरम्यान होते.
दुसरा मार्ग युरेशियन – आफ्रिकन हवाई मार्ग – युरोप, आशिया आणि आफ्रिका या खंडांच्या दरम्यान होणार्या स्थलांतराचा आहे. तिसरा मार्ग ऑस्ट्रेलियन हवाई मार्ग – दक्षिण पूर्व आशिया आणि ऑस्ट्रेलिया यादरम्यान होणारे स्थलांतर आणि चौथा मार्ग पेलॅजिक हवाई मार्ग – समुद्रावर होणारे स्थलांतर असे हे मार्ग आहेत.
भारतीय उपखंडात दोन मार्गांनी पक्षी स्थलांतर करून येतात. त्यातील सर्वात महत्त्वाचा मार्ग हा इंडस व्हॅली मार्ग म्हणून ओळखला जातो. हा आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेला, पाणथळीच्या पक्ष्यांचा चौथ्या क्रमांकाचा मार्ग म्हणून ओळखला जातो.
भारतात येणारे बहुतेक पक्षी या मार्गाने येतात. पक्ष्यांचा दुसरा हवाई मार्ग हा इशान्येकडून ब्रह्मपुत्रा नदीच्या मार्गाने भारतीय उपखंडात येतो. पुढे ते हिवाळ्याच्या कालावधीत येथे वास्तव्य करून परत आपल्या देशात जातात.
कोकणात विशेषतः रायगड जिल्ह्यात दरवर्षीच्या हिवाळ्यात 110 जातींचे परदेशी पक्षी स्थलांतर करून येत असतात. परंतु, अलीकडेच येऊन गेलेली 'निसर्ग' आणि 'तोक्ते' चक्रीवादळे, लांबलेला परतीचा पाऊस, ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरणात यंदा अपेक्षित थंडीऐवजी वाढत असलेला उष्मा, यामुळे परदेशी पक्ष्यांचे कोकणातील आगमन लांबले आहे.
सद्यस्थितीत रायगडमध्ये दरवर्षी येणार्या या 110 विविध परदेशी पक्ष्यांपैकी केवळ 50 जातींच्याच पक्ष्यांचे आगमन झाले असल्याचे निरीक्षणातून दिसून आल्याची माहिती अलिबाग येथील ज्येष्ठ पक्षी अभ्यासक व पक्षी छायाचित्रकार डॉ. वैभव देशमुख यांनी दिली आहे.
युरोपमधून दरवर्षी रायगड जिल्ह्यात अलिबागच्या समुद्र किनारपट्टीच्या क्षेत्रात येणारा गरुड प्रजातीतील 'ग्रेटर स्पॉटेड ईगल.'
(छाया : डॉ. वैभव देशमुख) सैबेरियातून लडाखमार्गे रायगड जिल्ह्यात यंदा सर्वप्रथम दाखल झालेला परदेशी पक्षी 'युरेशन हॉबी.'