

चंदगड; पुढारी वृत्तसेवा : हलकर्णी एमआयडीसीमधील काजूच्या टरफलापासून ऑईल निर्मिती करणाऱ्या कारखान्याला अचानक भीषण आग लागल्याची घटना आज (दि. २६) घडली. या आगीत कारखान्यासह कच्चामाल जळून खाक झाला आहे. यामध्ये सुमारे दीड कोटींचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
हलकर्णी एमआयडीसीत सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास अचानकपणे आग लागली. आगीने तात्काळ रौद्ररूप धारण केले. अग्निशमन गाडीला पाचारण करण्यात आले मात्र गाडी येईपर्यंत कारखान्याला आगीने वेढले. आगीच्या प्रचंड लोळामुळे परिसरात घबराट पसरली. आगीचे कारण मात्र उशिरापर्यंत स्पष्ट झाले नाही.
सचिन एम. चावरे यांच्या मालकीचा 'कल्याणी केमटेक' नावाने हलकर्णी एमआयडीसीत काजूच्या टरफलापासून ऑईल निर्मिती करणारा कारखाना आहे. सोमवारी आठवडी सुट्टीमुळे कारखाना बंद होता. पण बाराच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत कारखान्यातील मिशनरीसह कच्चामाल जळून खाक झाला. दरम्यान चंदगड नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र ऑईल निर्मितीचा कारखाना असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी जवानांसह कामगारांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. घटना पाहण्यासाठीनागरिकांनी मोठी गर्दी झाली होती.
हेही वाचा