

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅनडाच्या वायव्येकडील नॉर्थवेस्ट टेरिटोरीज या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे शहर येलोनाइफ येथे जंगलात मोठी आग भडकली आहे. या आगीच्या धोक्यामुळे वायव्य कॅनडातील येलोनाइफ शहर रिकामे करण्याचे आदेश बुधवारी (दि.१६) अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या शहरातून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. शहरापासून दक्षिणेकडे जाणाऱ्या एकमेव महामार्गावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याचे वृत्त 'CNN' ने दिले आहे.
प्रशासानाने नागरिकांना कॅनडातील वायव्येकडील येलोनाइफ शहरातून पडण्याचे आव्हान केले आहे. यानंतर कॅनडाच्या येलोनाइफ या शहरातून हजारो रहिवाशांनी गुरुवारी (दि.१८) जंगलातील आगीच्या भीतीने पलायन केले आहे. तर येथील काही लोकांना सुरक्षेसाठी शेकडो मैल पायपीट करावी लागली आणि आपत्कालीन फ्लाइटसाठी लांब रांगेत थांबले असल्याची दृश्ये समोर आली आहेत.
अग्निशमन माहिती अधिकारी माईक वेस्टविक यांनी सांगितले की, जोरदार वाऱ्यामुळे लागलेली आग यलोनाइफच्या उत्तर किनार्यापासून 16 किलोमीटर (10 मैल) आत होती आणि चार सर्वाधिक जोखीम असलेल्या भागातील लोकांना शक्य तितक्या लवकर निघून जाण्यास सांगण्यात आले आहे.
ब्रिटिश कोलंबिया हा कॅनडा देशाचा सर्वात पश्चिमेकडील प्रांत आहे. जेथे सुमारे ३७० ठिकाणी आगी लागल्या आहेत. दरम्यान अधिकारी याची खबरदारी घेत अधिकारी येथील नागरिकांचे स्थलांतर करत आहेत. हवामान अंदाजानुसार पुढील काही दिवस याठिकाणी विजा चमकतील, ज्यामुळे आग भडकू शकते तसेच जोरदार वाऱ्यामुळे ती पसरू शकते. गुरुवारपर्यंत देशभरात १ हजार ५३ जंगलात आगी लागल्या आहेत. त्यापैकी निम्म्याहून अधिक नियंत्रणाबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते अशी भिती येथील प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी अमेरिकेने देखील विनाशकारी जंगलातील आग पाहिली आहे. गेल्या आठवड्यात माउईच्या हवाई बेटावर लागलेल्या आगीत १०० हून अधिक लोक मारले गेले आणि एक ऐतिहासिक शहर नष्ट झाले. 100 वर्षांहून अधिक काळातील ही सर्वात प्राणघातक आग आहे. यानंतर कॅलिफोर्नियाच्या ओरेगॉनच्या सीमेजवळील ग्रामीण भागांना बुधवारी रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले. कारण वादळामुळे आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे येथीस जंगलात वीज पडल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.