Hawaii wildfires | हवाईतील मृतांचा आकडा ८० वर, हजारो घरे अन्‌ गाड्या जळून खाक, उद्ध्वस्त लाहैना शहराची भीषणता आली समोर (Video) | पुढारी

Hawaii wildfires | हवाईतील मृतांचा आकडा ८० वर, हजारो घरे अन्‌ गाड्या जळून खाक, उद्ध्वस्त लाहैना शहराची भीषणता आली समोर (Video)

हवाई (अमेरिका) : पुढारी ऑनलाईन, अमेरिकेच्या हवाई राज्यातील माउइच्या (island of Maui) बेटावरील जंगलातील वणव्याने लाहैना शहराचा बहुतांश भाग जळून खाक झाला आहे. या भीषण आगातील मृतांचा आकडा ८० वर पोहोचला आहे. ही आग इतक्या वेगाने कशी पसरली याची आता अधिकारी माहिती घेत आहेत. एएफपी वृत्तसंस्थेने ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत आगीने उद्ध्वस्त झालेल्या लाहैना शहराची भीषणता समोर आली आहे. या व्हिडिओत माउइ बेटावरील लाहैना शहरातील घरांचे आणि कारचे जळलेले अवशेष दिसतात. हवाई गव्हर्नर जोश ग्रीन यांनी या भागाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. (Hawaii wildfires)

हवाई हे अमेरिकेत सामील झाल्याच्या एका वर्षानंतर म्हणजेच १९६० मध्ये हवाईच्या बिग बेटावर त्सुनामीने ६१ लोकांचा बळी घेतला होता. आता भीषण आगीत होरपळून ८० लोकांचा मृत्यू झाला आहे. ही आग हवाई राज्याच्या इतिहासातील सर्वात घातक नैसर्गिक आपत्ती ठरली आहे.

येथील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या आगीत १ हजार इमारती जळून खाक झाल्या आहेत. यामुळे मोठ्या संख्येने लोक बेघर झाले आहेत. या शहराच्या पुनर्बांधणीसाठी अनेक वर्षे आणि अब्जावधी डॉलर्स लागतील, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

“ज्या इमारती जळून खाक झाल्या आहेत आणि तिथेच दुर्दैवाने मृतांची संख्या लक्षणीय वाढेल असा भिती आहे,” असे अमेरिकेच्या हवाईचे सिनेटर ब्रायन शॅट्झ यांनी एमएसएनबीसी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

आपत्तीचा इशारा मिळाला नाही

माउ काउंटीकडून जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की मृतांची संख्या ८० वर गेली आहे. या बेटावरील आणखी दोन ठिकाणी लागलेली आग ८० टक्के आणि ५० टक्के आटोक्यात आली आहे. आपत्तीच्या तीन दिवसांनंतर काही रहिवाशांना त्यांच्या घरांना आग लागण्यापूर्वी कोणतीही सूचना अथवा इशारा मिळाला होता की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. येथील बेटावर नैसर्गिक आपत्ती आणि इतर धोक्यांचा इशारा देण्यासाठी सायरन आहेत, पण ते आगीच्या वेळी वाजलेले नसल्याची माहिती समोर आली आहे. (Hawaii wildfires)

या आगीतून बचाव करत १४ हजारांहून अधिक पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तर वीज पुरवठा खंडित झाल्याने हजारो लोकांना याचा फटका बसला आहे. लाहैना या पर्यटन शहराचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी अनेक वर्षे आणि अब्जावधी डॉलर्स लागतील, असे हवाई येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.

हवाईचे गव्हर्नर जोश ग्रीन (Governor Josh Green) यांनी येथील या वणव्याला “हवाई राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती” असल्याचे म्हटले आहे. बेटाच्या पश्चिम किनार्‍यावरील पर्यटकांचे आकर्षण असलेला लाहैना या शहराचा ८० टक्के भाग उद्ध्वस्त झाला आहे आणि सुमारे १,७०० इमारती नष्ट झाल्या असल्याचे ग्रीन यांनी सांगितले. माउइच्या जंगलात आग मंगळवारी सुरू झाली आणि डोरा चक्रीवादळाच्या वाऱ्यामुळे ती वेगाने पसरली.

माउइच्या पश्चिम किनारी भाग आगीच्या विळख्यात सापडला असून याचा सर्वाधिक फटका लाहैना शहराला बसला आहे. येथील शेकडो घरे जळून खाक झाली आहेत.

माउइ बेटाविषयी….

माउइ हे हवाई राज्यातील बेटांपैकी दुसरे सर्वात मोठे आणि अमेरिकेतील १७ वे सर्वात मोठे बेट आहे. माउइ हे माउ काउंटीच्या चार बेटांपैकी सर्वात मोठे आहे, ज्यामध्ये मोलोकाई, लानाई आणि लोकवस्ती नसलेल्या काहोओलावे यांचा समावेश आहे. या बेटावरील लाहैना हे महत्वाचे शहर आहे.

हे ही वाचा :

Back to top button