karnataka cm updates | कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्यांना संधी?

karnataka cm updates | कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्यांना संधी?
Published on
Updated on

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : Karnataka CM : कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कोण? त्याबद्दल दिवसभर राजधानी दिल्लीत खल सुरू राहिला. नवीन सरकारच्या शपथविधीला 48 तास बाकी आहेत. डी. के. शिवकुमार हे मंगळवारी राजधानी दिल्लीत दाखल झाले. सिद्धरामय्या यांनी सोमवारीच पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंपासून ते वेणुगोपाळांपर्यंत अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. ते सोमवारपासूनच दिल्लीत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन कर्नाटकच्या विषयावर सुमारे दीड तास चर्चा केली. बैठकीत तीन संभाव्य तोडग्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री कोण? त्याबाबतचा निर्णय मात्र जाहीर करण्यात आला नाही. सिद्धरामय्या हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, हे ठरल्यात जमा असल्याचे सांगण्यात येत असले, तरी याबाबतची घोषणा मात्र पक्षाध्यक्ष खर्गे बुधवारी बंगळूर येथे करणार आहेत, अशी बातमी एका वृत्तसंस्थेने पक्षांतर्गत सूत्रांच्या हवाल्याने दिली.

सोमवारी बंगळूरहून आलेल्या पक्ष निरीक्षकांचा अहवाल खर्गे यांना सादर करण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळी राहुल गांधी खर्गे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी सुमारे दीड तास कर्नाटकातील स्थितीवर चर्चा केली. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला उपस्थित होते. (karnataka cm updates)

मंगळवारी दुपारी शिवकुमार दिल्लीत आले. त्यांनीही भेटीगाठींचे सत्र सुरू केले आहे. विमानतळावर त्यांच्यावर पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार केला; पण हात जोडून हसत नमस्कार करीत त्यांनी वाहनाचा रस्ता पकडला.

karnataka cm updates : फोन आल्याने दिल्लीला

दिल्लीला निघण्याआधी बंगळुरात पत्रकारांशी बोलताना शिवकुमार म्हणाले की, काँग्रेस पक्ष माझ्यासाठी आई आहे, मंदिर आहे. मला पक्षाच्या सरचिटणीसांचा फोन आला, दिल्लीला एकटेच या. मी एकटाच जात आहे. कर्नाटकातील जनतेने काँग्रेसला आशीर्वाद दिला आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रच राहायला हवे, असे माझे मत आहे. काही माध्यमांमध्ये खासकरून वृत्तवाहिन्यांवर जर मुख्यमंत्रिपद मिळाले नाही, तर शिवकुमार राजीनामा देतील, अशा बातम्या झळकत आहेत. त्यावर संताप व्यक्त करीत शिवकुमार म्हणाले की, काँग्रेस पक्ष मला आईइतकाच प्रिय आहे. त्यामुळे जर कुणा वाहिनीने माझ्या राजीनाम्याच्या बातम्या दाखवल्या, तर त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करू.

Karnataka CM : जी. परमेश्वर यांचीही उडी

सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात चुरशीची लढत असताना आता त्यात माजी उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते जी. परमेश्वर यांनीही उडी घेतली आहे. लिंगायत आणि वोक्कलिग समाजाच्या वतीने सिद्धरामय्या व शिवकुमार यांच्या बाजूने मागण्या केल्या जात असताना, कर्नाटकातील दलित संघटनांनी दलित मुख्यमंत्री देण्याची मागणी करीत परमेश्वर यांचे नाव पुढे केले. याबाबत परमेश्वर म्हणाले की, जर पक्षश्रेष्ठींनी विचारणा केली; तर सरकार चालवायला मी तयार आहे. मी पक्षासाठी काय केले हे सर्वांना ठाऊक आहे. मला लॉबिंग करण्याची गरज नाही.

मंगळवारी राहुल गांधी यांच्यासोबत दीर्घकाळ खलबते केल्यानंतर सायंकाळी पाच वाजता खर्गे यांनी शिवकुमार यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा संपल्यानंतर सिद्धरामय्या खर्गे यांना भेटले. दोन्ही नेत्यांसमोर खर्गे यांनी काही फॉर्म्युले मांडले. सोनिया गांधी यांनी टाकलेला विश्वास आपण सार्थ करून दाखविला आहे, त्यामुळे मुख्यमंत्री ठरविताना त्यांचे मत विचारात घ्यावे, असे शिवकुमार यांनी पक्ष नेतृत्वाला कळविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हे ही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news