

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा भेंडवळ (ता.जळगाव जामोद) येथील अक्षय तृतीयेच्या परंपरागत घटमांडणीचे भाकित जाहिर झाले आहे. चंद्रभान महाराज यांनी ३७० वर्षापूर्वी सुरू केलेल्या घटमांडणीची परंपरा त्यांच्या वंशजांनी पुढे सुरू ठेवली आहे. पुंजाजी महाराज वाघ व सारंगधर महाराज वाघ या दोघा वंशजांनी घटमांडणीचे भाकित आज (रविवार) पहाटे जाहिर केले आहे. यात वर्तविल्यानुसार, जून महिन्यात कमी पाऊस पडणार असून, खरिपाच्या पेरण्या उशिरा होतील. जुलै महिन्यात सर्वसाधारण पाऊस तर आगस्ट महिन्यात अतिवृष्टी होईल. सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी असेल. या खरिपात अवकाळी पाऊस भरपूर होणार असल्याने पिकांची नासाडी होईल. कपाशी, मुग, ज्वारी, बाजरी, तीळ ही पिके सर्वसाधारण राहतील. तीळ, बाजरी पिकांची नासाडी होईल. तांदूळाचे पीक चांगले येईल. हरबरा पिकाबाबत अनिश्चितता वर्तवली आहे. हरबरा पीक कमी जास्त येईल व नुकसान होईल. असे शेतीविषयक भाकित करण्यात आलंय.
दरम्यान देशाचा राजा कायम राहील, मात्र राजाला अडचणींचा सामना करावा लागल्याने राजा तणावात असेल. राजकिय उलतापालथी होतील असे भाकित भेंडवळच्या घटमांडणीत वर्तविण्यात आले आहे.
अशी केली जाते घटमांडणी…
भेंडवळच्या पारंपरिक घटमांडणीच्या भाकितातून येत्या वर्षातील पाऊस, पीक स्थिती, हवामान, राजकीय व आर्थिक परिस्थिती तसेच देशाच्या संरक्षणाबाबत भाष्य केले जाते. अक्षयतृतीयेच्या सायंकाळी गावालगतच्या शेतात गोल रिंगण करून त्याच्या मध्यभागी खड्डा खोदून त्यात मातीच्या चार ढेकळांवर पाण्याने भरलेला मातीचा घट (घडा) ठेवला जातो. घटावर पापड, भजी, वडा, भांडी, कुरडई आदी तळलेले खाद्यपदार्थ ठेवले जातात. तर खाली जमिनीवर विड्याचे पान व सुपारी ठेवली जाते. घटाभोवती अठरा प्रकारची धान्ये ठेवली जातात. रात्रीतून या धान्य व पदार्थांवर होणा-या बदलांवरुन भाकित सांगितले जाते. पानविड्यावरून राजाची स्थिती, करंजीवरून देशाची आर्थिक स्थिती, भादली धान्यावरून पिकांची रोगराई, मसूर धान्यावरून परकीय घुसखोरी आदी विषयी भाकित वर्तविण्यात येते.
हेही वाचा :