पुणे : पुढारी वृत्तसेवा : कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील एटीएम स्विच (सर्व्हर) सायबर हल्ला करून 94 कोटी 42 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने 11 जणांना शिक्षा सुनावली. फहिम मेहफुज शेख (रा. भिवंडी), फहिम अझीम खान, शेख मोहम्मद अब्दुल जब्बार (रा. सिल्लोड), महेश साहेबराव राठोड (रा. भोकर, जि. नांदेड), नरेश लक्ष्मीनारायण महाराणा (रा. विरार), मोहम्मद सईद ईक्बाल हुसेन जाफरी ऊर्फ अली (रा. भिवंडी), युस्टेस अगस्टीन वाझ ऊर्फ थोनी (रा. जोगेश्वरी, मुंबई), अब्दुल्ला अफसरअली शेख (रा. मिरा रोड, इस्ट, ठाणे), बशीर अहमद अब्दुल अझीज शेख (रा. भायखळा, मुंबई), सलमान मोहम्मद नईम (रा. मुंब—ा, ठाणे), फिरोज यासीन शेख (रा. काळा चौकी, मुंबई) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
कॉसमॉस बँकेच्या गणेशखिंड रोडवरील मुख्यालयात असलेल्या सर्व्हरवर सायबर हल्ला करून सायबर चोरट्यांनी 11 ऑगस्ट 2018 रोजी बँकेच्या काही व्हिसा व रुपे डेबिट कार्डधारकांची माहिती चोरून, क्लोन व्हिसा डेबिट कार्डद्वारे प्रत्यक्ष एटीएम सेंटरवर जाऊन क्लोन कार्डद्वारे भारताबाहेर 78 कोटी रुपये व भारतामध्ये क्लोन रुपे डेबिट कार्डद्वारे 2 हजार 849 व्यवहार करून 2 कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक केली.
त्यानंतर 13 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता स्विफ्ट ट्रान्झेक्शन इनिशिएट करून हँगसेंग बँक हाँगकाँग या बँकेच्या एएलएम ट्रेडिंग, हाँगकाँग यांच्या बँक खात्यावर 13 कोटी 92 लाख रुपये जमा करून ते काढून घेतले गेले होते. या गुन्ह्याचा सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्याकडे तपास देण्यात आला होता. एनपीसीआय, व्हिसा व बँकेकडून प्राप्त माहितीचे तांत्रिक विश्लेषण केले असताना जास्त रक्कमा कोल्हापूर, मुंबई, अजमेर व इंदौर या शहरातून काढल्याचे आढळून आले. या माहितीचे विश्लेषण करून सायबर पोलिसांनी या ठिकाणाहून 2018 व 2019 मध्ये एकूण 18 आरोपींना अटक केली. तपासादरम्यान प्राप्त झालेले सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक पुराव्या आधारे त्यांचेविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. त्यांच्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून 17 आरोपी अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत.
या आरोपींपैकी पहिल्या 7 जणांना कलम 420 अन्वये 4 वर्षे साधी कैद, 200 रुपये दंड तसेच 467, 468, 471 अन्वये 4 वर्षे 7 महिने साधी कैद, 200 रुपये दंड, कलम 469 अन्वये 3 वर्ष साधी कैद व 100 रुपये दंड, कलम 120 ब अन्वये 6 महिने कारावास, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 सी अन्वये 3 वर्ष साधी कैद, 100 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन अपर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलिस उपायुक्त ज्योतिप्रिया सिंह, संभाजी कदम, सहायक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी केला. विशेष पोलिस महानिरीक्षक बि—जेश सिंह, भारती राष्ट्रीय भुगतान निगम, न्यायवैद्यक प्रयोगशाळा, गणेशखिंड आणि हाथवे इंटरनेट यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने अॅड. बोधिनी यांनी काम पाहिले.