

घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर आणि त्याची साथीदार लीना पॉल यांच्या हवाला प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरुन सक्तवसुली संचालनालयाने (ED) गुरुवारी (दि.१४) अभिनेत्री नोरा फतेही (actor nora fatehi) हिची चौकशी केली. फोर्टिस हेल्थकेअर कंपनीचे प्रवर्तक शिवइंदर सिंग तसेच त्यांच्या पत्नीची सुमारे दोनशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप सुकेश आणि लीना यांच्यावर आहे.
शिवइंदर सिंग यांच्या पत्नी आदिती सिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दिल्ली पोलिसांनी याआधीच सुकेश व लीनाविरोधात फसवणूक आणि खंडणी वसुलीचे गुन्हे दाखल केले आहेत. आपण केंद्रीय कायदा मंत्रालयात वरिष्ठ अधिकारी असून तुरुंगात असलेल्या शिवइंदर सिंग यांना जामीन देण्यास मदत करतो, असे आमिष सुकेश याने आदिती सिंग यांना दाखविले होते.
या माध्यमातून त्याने ३० हप्त्यात सुमारे दोनशे कोटी रुपये उकळले होते. हा पैसा भाजपच्या फंडमध्ये जाणार असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपल्या बाजूने आहेत, असे लालूचही त्याने फिर्यादीला दाखविले होते. विशेष म्हणजे आदिती सिंग यांची फसवणूक करण्याआधी सुकेशवर २१ गुन्हे दाखल होते आणि दिल्लीच्या रोहिणी तुरुंगात बंद असताना त्याने ही फसवणूक केली होती.
तुरुंगात बसूनच तो खंडणी वसुलीचे रॅकेट चालवित असल्याची बाब उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. स्थानिक न्यायालयाने नुकताच सुकेशच्या कोठडीत ११ दिवसांची तर लीना पॉलच्या कोठडीत १६ दिवसांची वाढ केली होती.
शिवइंदर आणि आदिती सिंग यांनी केलेल्या घोटाळ्याची इत्यंभूत माहिती काढल्यानंतर त्याने हवालाच्या माध्यमातून वरील दोघांकडून दोनशे कोटींची खंडणी उकळली होती. गेल्या ऑगस्ट महिन्यात ईडीने चेन्नईतील सुकेशचा ८३ लाख रुपयांचा समुद्रासमोरचा आलिशान बंगला, डझनभर मोटारकार जप्त केल्या होत्या. याशिवाय २० कोटी रुपयांची इतर मालमत्ताही ताब्यात घेतली होती.
या प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयातून ईडीने गेल्या महिन्यात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिची चौकशी केली होती. त्यानंतर आता नोरा फतेही हिची चौकशी करण्यात आली आहे.