नाशिक : नांदूरला एकाच रात्री घरफोड्यांचा ‘सिक्सर’ | पुढारी

नाशिक : नांदूरला एकाच रात्री घरफोड्यांचा ‘सिक्सर’

नाशिक (नांदूरशिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा
येथील निमोण नाका परिसरात सोमवारी (दि.8) मध्यरात्री 1 ते 2 च्यादरम्यान चार कृषी सेवा केंद्रे, एक मेडिकल, एक जनरल स्टोअर असे सहा दुकानांचे शटर वाकवून चोरट्यांनी घरफोडी केली. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. या चोरीमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून, पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

येथील महारुद्रा जनरल स्टोअर्सचे संचालक दत्तात्रय सानप हे मंगळवारी (दि. 8) पहाटे 5 च्या सुमारास आपल्या दुकानाकडे चक्कर मारण्यासाठी गेले असता त्यांना दुकानाचे शटर वाकविलेले दिसले. त्यांनी परिसरातील दुकाने बघितली असता बर्‍याच दुकानांचे शटर फोडलेले असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर चोरट्यांचा प्रताप समोर आला. प्रत्येक दुकानदाराने आपापल्या दुकानावर येऊन नुकसानीचा अंदाज घेतला. महारुद्रा जनरल स्टोअरमधील 6 हजार 300 रुपयांची रोख रक्कम, साई मेडिकलचे शटर वाकवून 2 हजारांची रोख रक्कम व इतर वस्तू चोरून नेल्या. सदरच्या दुकानासमोरील शिवनेरी कृषी सेवा केंद्र या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी आतील गल्ला अस्ताव्यस्त करून बघितला असता त्यात काही मिळून आले नाही. त्यानंतर त्यांनी सागर अ‍ॅग्रो या दुकानाकडे मोर्चा वळविला व त्याचेही शटर वाकविले. आतील 250 रुपयांची चिल्लर लंपास केली. हाकेच्या अंतरावर असलेल्या व्ही. पी. नाईक हायस्कूल गेटसमोरील रेणुका माता कृषी सेवा केंद्राचे शटर वाकवून गल्ल्यातील 10 हजार 500 रुपये रक्कम घेऊन चोरटे प्रसार झाले. त्याच दरम्यान गावापासून पुढे असणार्‍या सानप वस्ती या ठिकाणी लक्ष्मी अ‍ॅग्रो दुकानाचे शटर वाकून 4 हजार रुपये रोख व इतर शेती उपयोगी साहित्य चोरून चोरटे पसार झाले. सकाळी 8 वाजता नांदूर पोलिस दूरक्षेत्राचे सहायक उपनिरीक्षक आर. टी. तांदळकर यांनी पाहणी केली. पोलिसांनी दुकानांचा परिसर पंचनामा करून माहिती घेतली. वावी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली आर. टी. तांदळकर व पोलिस कर्मचारी पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा:

Back to top button