

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- अयोध्येतील रामलल्ला प्रतिष्ठापना ही देशभरातील जनतेच्या श्रध्देचा विषय असला तरी, भाजपने तो राजकीय इव्हेंट बनवला. राजकीय इव्हेंट उभा करण्यात भाजपचा हात कुणीच धरू शकत नाही. यामाध्यमातून भाजपने २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात केली आहे, अशा शब्दांत शिवसेने(उध्दव बाळासाहेब ठाकरे)चे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आसामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर भाजप सरकारच्या गुंडांनी हल्ला केल्याचे सांगत या लोकशाहीविरोधी कृत्याचा आम्ही निषेध करतो, अशी टीकाही राऊत यांनी केली आहे.
ठाकरे गटाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आलेल्या खा. राऊत यांनी सोमवारी (दि.२२) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले की, आसाममध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला. तेथील भाजप सरकारच्या गुंडांनी यात्रेवर हल्ला केला. हुकूमशाहीचाच हा प्रकार आहे. या घटनेनंतर राहुल गांधी, वेणुगोपाल यांच्याशी आपले फोनवर संभाषण झाले. शिवसेना या हल्ल्याचा निषेध करते. लोकशाही वाचविण्यासाठी आणि देशातील वातावरण बदलण्यासाठीच नाशिकमध्ये महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याविषयी मतभेद करू इच्छित नाही. परंतू जेवढे महत्त्व अयोध्येला आहे तेवढेच नाशिकच्या पंचवटीला आहे. अयोध्येत श्रीरामाने राज्य केले. तर पंचवटीत त्यांचा संबंध संघर्ष, त्याग आणि लढ्याशी आहे. त्यामुळेच आम्ही अधिवेशनासाठी नाशिकची निवड केली असून, अधिवेशनाच्या रुपाने हुकूमशाहीविरोधातील संघर्षाला सुरूवात केली जाणार असून, नंतर अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले जाईल, असे खा. राऊत यांनी सांगितले.
अयोध्येच्या सोहळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या निमंत्रणावरही त्यांनी टीका केली. शिंदे यांना सर्वप्रथम आम्हीच अयोध्या दाखविली. शरयु नदीवरील महाआरतीच्या सोहळ्याचे यजमानपद त्यावेळी नाशिककडेच होते, असेही राऊत यांनी सांगितले.
हेही वाचा :