नागपूर : सिनेट निवडणूक- पदवीधरमध्ये ८ जागांवर ‘अभाविप’चा झेंडा, ‘मविआ’ला धक्का

नागपूर : सिनेट निवडणूक- पदवीधरमध्ये ८ जागांवर ‘अभाविप’चा झेंडा, ‘मविआ’ला धक्का
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदवीधर सिनेटच्या निवडणुकीत भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्याथीं परिषदेने (ABVP) 10 पैकी 8 जागा जिंकून आपला झेंडा रोवला आहे. मविआला एकच जागा मिळाल्याने जोरदार धक्का बसला. रविवारी यासाठी मतदान झाले होते. मंगळवारी सुरू झालेली मतमोजणी मतांचा कोटा प्रक्रियेत दोन दिवस चालली. विद्यापीठाच्या गेल्या निवडणुकीत अभाविप, महाविकास आघाडी तसेच परिवर्तन पॅनेलला संमिश्र यश मिळाले होते. यावेळी मात्र अभाविपने सर्वांना मागे टाकत एकहाती विजय संपादन केला. महाविकास आघाडी आणि युवा ग्रॅज्युएट फोरमला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. या विजयामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, महाविकास आघाडी व तरूणांसाठी लढा देणाऱ्या इतर संघटनांमध्ये निरूत्साह दिसला. या निवडणुकीच्या राखीव प्रवर्गातील सर्व पाच जागांवर अखिल भारतीय विद्याथीं परिषदेच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला. त्यापाठोपाठ खुल्या प्रवर्गातील 5 पैकी 3 जागांवरही विजय संपादन केला.

पदवीधराच्या 10 जागांसाठी 51 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातील पाच राखीव जागांवर अभाविपने बाजी मारली. प्रथमेश फुलेकर (अनुसूचित जाती), सुनील फुडके, दिनेश शेराम (अनुसूचित जमाती), वामन तुर्के (विमुक्त जाती), रोशनी खेळकर (महिला राखीव) विजयी झाले. बुधवारीच रात्री हे निकाल स्पष्ट झाले होते. दरम्यान, खुल्या प्रवर्गाची मतमोजणी मात्र सुरूच होती. आता या जागांचेही निकाल जाहीर झाले आहे. खुल्या प्रवर्गातून अभाविपचे विष्णू चांगदे, मनीष वंजारी, अजय चव्हाण यांनी बाजी मारली. महाविकास आघाडीचे अॅड. मनमोहन बाजपेयी आणि युवा ग्रॅज्युएट फोरमचे राहुल हनवते यांनी विजय मिळविला.

कमी मतदानाचा 'अभाविप' ला फायदा

या निवडणुकीत केवळ 22.97 टक्केच मतदान झाले. एकूण 60 हजारांवर मतदार होते. यापैकी केवळ 12ते 13 हजार मतदारांनीच मतदान केले. तरूण व सुशिक्षीत मतदार मतदानासाठी गेले नाहीत, हे या निवडणुकीचे अपयश मानले जाते. शिक्षक,पदवीधर निवडणुकीत भाजपला मात देणाऱ्या मविआ व दोन्ही आघाडयांनी त्यांचे परंपरागत मतदार मतदानासाठी बाहेर काढले नाहीत. उलटपक्षी, अभाविपने अचूक व्यूहरचना करीत त्यांचे मतदान करवून घेतल्याने त्यांना विजय मिळविता आला. या निकालाने पुन्हा एकदा केवळ उत्साहात मतदार नोंदणी करून आपणच विजयी होणार, असा फाजील आत्मविश्वास नडतो हे सिद्ध केले. तो यावेळी मविआ व दोन्ही संघटनाला नडला. सहा जागा काँग्रेस, दोन शिवसेना तर दोन जागा राष्ट्रवादी आणि मित्र संघटनांना विभागून देण्यात आल्या होत्या. शिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. युवा सेनेचे वरून सरदेसाई स्वतः नागपुरात तळ ठोकून होते. भाजपने कमबॅक केल्याने आगामी निवडणुकीत सावध राहण्याची मविआला गरज आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news