मालमत्ता विकून बाजार समित्यांची निवडणूक घ्या : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आदेश | पुढारी

मालमत्ता विकून बाजार समित्यांची निवडणूक घ्या : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आदेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील १५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडे निवडणूक निधी नसल्याने आर्थिक अडचण निर्माण झाल्याने कायद्यान्वये संबंधित बाजार समितीच्या स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करून सक्तीने त्याची विक्री करावी आणि तत्काळ निवडणूक कार्यक्रम घ्यावा असे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिले आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शक पद्धत अवलंबावी, आचारसंहितेचे पालन करुन कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवावी. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा
उपनिबंधकांना दिल्या आहेत. – डॉ. जगदीश पाटील, आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण

त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील मुळशी, हिंगोलीतील सिरसम, लातूरमधील अनंतपाळ, नांदेड जिल्ह्यातील कंधार, बिलोली, किनवट, इस्लापूर, कुंडलवाडी, लोहा, माहूर, उमरी, मुखेड या नऊ आणि बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा, सिंदखेड राजा, संग्रामपूर या तीन मिळून १५ बाजार समित्यांचा समावेश आहे.

राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांसंदर्भात आयुक्त डॉ. पाटील यांनी सर्व जिल्हा उपनिबंधकांची ऑनलाईन बैठक सोमवारी (दि. २०) घेतली. त्यामध्ये त्यांनी हे आदेश दिलेले आहेत. बैठकीस निवडणूक प्राधिकरणाचे सचिव व सहकारचे अपर निबंधक डॉ. पी. एल. खंडागळे, पणन संचालक विनायक कोकरे आदी उपस्थित होते.

निवडणूक निधीची अडचण

राज्यातील २५८ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिध्द झालेल्या आहेत. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये ४ बाजार समित्यांच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. त्यामध्ये जाफराबाद, भोकरदन, वसमत, धारुर यांचा समावेश आहे. तर १५ बाजार समित्यांच्या निवडणुका घ्यायच्या आहेत. परंतु निवडणूक निधीची अडचण आहे, अशा समित्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तांचा लिलाव करुन निवडणूक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Back to top button