

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : अलिकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपला जबरदस्त यश मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवी टोपी परिधान करीत रॅलीत सहभाग घेतला होता. (BJP Parliamentary Meeting)
भाजप संसदीय मंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत अशीच टोपी पक्षाच्या तमाम खासदार व नेत्यांनी घातल्याचे चित्र पहावयास मिळाले. गुजरात प्रदेश भाजपकडून अशा प्रकारच्या चारशे टोप्या खासदारांकरिता पाठविण्यात आल्या होत्या, असे भाजपच्या पदाधिकार्याकडून सांगण्यात आले.
संसदीय मंडळाच्या बैठकीवेळी खासदार, नेत्यांना एनर्जी बुस्टर नावाचे एनर्जी चॉकलेटही देण्यात आले होते. एनर्जी बुस्टरवरील वेस्टनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र होते. विधानसभा निवडणुकांतील विजयानंतर अहमदाबाद येथे निघालेल्या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवी टोपी घातली होती. अशा प्रकारची टोपी प्रामुख्याने उत्तराखंड राज्यात घातली जाते.
पंतप्रधानांनी जी टोपी घातली होती, त्यावर कमळाचे चित्र होते. अशीच टोपी पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत खासदार आणि नेत्यांनी घातली होती. पक्ष कार्यकर्त्यांना ही टोपी पसंत पडल्याने तिचे खासदारांना वाटप करण्यात आल्याचे पक्ष सूत्रांनी नमूद केले. (BJP Parliamentary Meeting)