

पुढारी ऑनलाईन डेस्क : Bikini killer : सध्या एक बातमी व्हायरल होताना दिसते आहे ती चार्ल्स शोभराजच्या सुटकेची. अतिशय टापटीप राहणी, उत्तम मॅनर्स आणि भूरळ पाडणारं संवाद कौशल्य असलेल्या या इसमाने एकेकाळी जगातील अनेक तपास संस्थांना घाम फोडला होता. कारण वेश बदलण्यात, पोलिसांना चकवा देण्यात त्याचं असलेलं कौशल्य. विशेष म्हणजे २० पेक्षा अधिक हत्या करूनही त्याला फाशी न होता केवळ जन्मठेपेची शिक्षाच होऊ शकली. पण आता जवळपास १९ वर्षांनी तो नेपाळच्या जेलमधून बाहेर येतो आहे. दोन अमेरिकन मुलींच्या हत्येच्या आरोपाखाली चार्ल्सला नेपाळ पोलिसांनी अटक केली होती. अर्थातच त्याला त्यानंतर फ्रांसला पाठवलं जाणार आहे.
Bikini killer : कोण आहे चार्ल्स शोभराज ?
हतचंद भाओनानी गुरुमुख चार्ल्स शोभराज असं नाव असलेल्या चार्ल्सची कहाणीही गुन्ह्याप्रमाणेच गुंतागुतीची आहे. व्हिएतनामी आई आणि भारतीय वडिलांच्या पोटी चार्ल्सचा जन्म झाला. पण त्याच्या जन्मानंतर आईने एका फ्रेंच व्यक्तीशी लग्न केलं. त्यामुळे चार्ल्सलाही फ्रेंच नागरिकत्व मिळालं. फ्रांसमध्ये चोरीच्या आरोपाखाली त्याला पहिल्यांदा अटक झाली. पण त्यांनंतर सिरीयल किलिंगचं सत्र सुरू झालं ते थायलंडमध्ये. स्विमिंग पूलमध्येच त्याने एका पर्यटकाचा खून केला. त्यानंतरच्या संपूर्ण सत्तरच्या दशकात त्याने एक-दोन नाही तर तब्बल १२ पर्यटकांना जीवे मारलं. त्यांपैकी केवळ सहा हत्यांच्या आरोपाखाली त्याच्या विरोधात वॉरंट जारी केला गेला. या हत्यांमध्ये महिलांना आधी अमली पदार्थ दिले गेले. त्यानंतर काहींची गळा दाबून, काहींना पाण्यात बुडवून ठार मारलं.
चार्ल्सने केलेल्या खुनाची पद्धत म्हणजे त्याने बहुतांश खून हे पट्टाया येथील बीचवर आलेल्या परदेशी महिला पर्यटकांचे केले. या महिलांचे मृतदेह सापडायचे त्यावेळी त्यांच्या शरीरावर बिकिनी हाच वेश असायचा. त्यानंतर तो या महिलांच्या जवळील ड्रग्स आणि पैसे घेऊन फरार व्हायचा.
फाशीची शिक्षा द्यायची झाल्यास गुन्हा घडल्यापासून २० वर्षांच्या आत दिली जावी असा थायलंडमध्ये कायदा आहे. या पळवाटेचा फायदा घेत चार्ल्स भारतात पळून गेला होता.
हेही वाचा