२० तरुणींचा खून करणारा बिकिनी किलर चार्ल्स शोभराजची तुरुंगातून मुक्तता, गोव्यात केली होती अटक | पुढारी

२० तरुणींचा खून करणारा बिकिनी किलर चार्ल्स शोभराजची तुरुंगातून मुक्तता, गोव्यात केली होती अटक

पणजी;पुढारी वृत्तसेवा : १९७०, १९८० मधील कुख्यात गुन्हेगार, बिकिनी किलर म्हणून जगभर प्रसिद्ध झालेल्या चार्ल्स शोभराजला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने मुक्त केले आहे. ७८ वर्षीय चार्ल्सला वयाचे कारण देत तुरुंगातून मुक्त केले आहे. त्याच्यावर दक्षिण आशियायी देशांतील २० तरुणींच्या खुनाचा आरोप आहे.

तिहार तुरुंगातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या चार्ल्सला १९८६ मध्ये पर्वरी येथील ओ कोकेरो या हॉटेलमध्ये मुंबई पोलीस अधिकारी मधुकर झेंडे यांनी नाट्यमयरित्या अटक केली होती. चार्ल्सचा जन्म १९४४ मध्ये व्हिएतनाम येथे झाला. त्याची आई व्हिएतनामची तर वडील भारतीय होते. त्याची आई त्याला पुढे फ्रान्स येथे घेऊन गेली.. लहानपणापासूनच त्याने लहान-मोठे गुन्हे करण्यास सुरू केले. १९७० मध्ये तो भारतात आला. काही वर्षांतच त्याने विविध वस्तूंची तस्करी सुरू केली.

यानंतर तो दहा खोट्या पासपोर्टच्या सहाय्याने युरोप, आशियामध्ये फिरू लागला. याच काळात त्याने हत्याकांड सुरू केले. पर्यटक महिलांशी दोस्ती करून मग त्यांना लुबाडणे आणि मारून टाकणे हा त्याचा शौक झाला. त्याला उंची मद्य, खानपान, आकर्षक राहणीमान करण्याचा शौक होता. १९८६ मध्ये तो हिप्पी पर्यटकांना लुबाडण्यासाठी गोव्यात आला होता. याबाबत मुंबई पोलिसांना खबर लागताच त्यांनी सापळा रचून त्याला ओ कोरोमधून अटक केले होते.

Back to top button