Opposition unity : विरोधकांच्‍या एकजुटीचा ‘नितीश फॉर्म्युला’; ममता म्‍हणाल्‍या, ‘मला अहंकार नाही’!

Opposition unity : विरोधकांच्‍या एकजुटीचा ‘नितीश फॉर्म्युला’; ममता म्‍हणाल्‍या, ‘मला अहंकार नाही’!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विरोधी राजकीय पक्षांची एकजूट करण्‍यासाठी बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार सरसावले आहेत. ( Opposition unity ) विरोधी पक्षांच्‍या एकवाक्‍यतेसाठी त्‍यांनी आज (दि. २४) पश्‍चिम बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकाता येथे मंत्रालयात भेट घेतली. विशेष म्‍हणजे यावेळी बिहारचे उपमुख्‍यमंत्री व लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्‍वी यादवही उपस्‍थित होते.

Opposition unity : विरोधकांना  एकत्र आणण्‍याची जबाबदारी नितीश कुमारांवर

नरेंद्र मोदी यांच्‍याविरोधात विजय मिळवण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत एक-विरुद्ध-एक धोरण राबवणे गरजेचे आहे. भाजप उमेदवारा विरोधात विरोधी पक्षाकडून एक उमेदवार दिला जावा , असे ज्येष्ठ जनता दल-युनायटेड नेते के. सी त्यागी यांनी सांगितले होते. आता विरोधी पक्षांच्‍या ऐक्यासाठी एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याची जबाबदारी नितीश कुमार यांनी घेतली आहे. याशिवाय समविचारी पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी त्यांनी काँग्रेसवर सोपवली आहे. या पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या पक्षांचा समावेश आहे.

समविचारी पक्षांनी एकत्र येवून रणनीती आखावी लागेल : नितीश कुमार

ममता बॅनर्जी यांच्‍याबरोबर झालेल्‍या बैठकीनंतर माध्‍यमांशी बोलताना नितीश कुमार म्‍हणाले की, आम्‍ही आगामी निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांच्‍या एकजुटीबाबत आम्‍ही चर्चा केली. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येवून २०२४ लोकसभा निवडणुकीची रणनीती आखावी लागणार आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्र येत नाहीत तोपर्यंत रणनीती तयार होणार नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

मला अहंकार नाही, भाजप 'हिरो'चा झिरो व्‍हायला हवा : ममता बॅनर्जी

यावेळी माध्‍यमांशी बोलताना ममता बॅनर्जी यांनी स्‍पष्‍ट केले की, नितीश कुमार यांच्‍याबरोबर झालेल्‍या भेटीमुळे सर्व पक्षांना संदेश जणार आहे की, आगामी निवडणुकीच्‍या तयारीसाठीआम्‍ही एकजुटी केली आहे. तसेच यापुढे आम्‍ही एकत्र येणार आहोत. भाजपविरोधी पक्षांच्या महाआघाडीबाबत मला कोणताही अहंकार नाही. भाजपविरोधातील सर्व समविचारी विरोधी पक्षांनी एकत्र येण्यास कोणताही आक्षेप नाही, असेही ममता बॅनर्जी यांनी स्‍पष्‍ट केले. आता समविचार पक्षांनी एकत्र येण्‍यासाठी बिहारमध्ये बैठक व्‍हावी. यानंतर भविष्‍यातील रणनीती ठरवता येईल, असेही त्‍या म्‍हणाल्‍या. आजपर्यंत खोटे बोलत भाजप हिरो बनले आहे. हाच भाजप झिरो व्हायला हवा, अशी अपेक्षाही ममता बॅनर्जी यांनी व्‍यक्‍त केली.

Opposition unity : नितीश कुमार घेणार अखिलेश यादव यांची भेट

ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्‍यानंतर आता नितीशकुमार हे उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेणार आहेत. यासाठी ते उत्तर प्रदेशला जाणार आहेत.  नितीश कुमार यांनी नुकतीच काँग्रेस अध्‍यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली होती. दिल्लीत झालेल्या या बैठकीत काँग्रेसपासून वेगळे झालेल्‍या पक्षांना एकत्र आणण्यासाठी नितीशकुमार प्रयत्न करतील, असे ठरले होते. दरम्‍यान, काँग्रेसविरोधात यापूर्वी समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेससह बीआरएस आदी पक्षांनी टीका केली आहे. ममता बॅनर्जी यांनीही अनेकदा काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. इतकंच नाही तर पाच राज्‍यांमधील विधानसभा निवडणुकीपूर्वीही काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमधील मतभेद चव्‍हाट्यावर आले होते. अखिलेश यादव यांनीही आपण काँग्रेससारख्या पक्षांशी युती करण्याच्या बाजूने नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. आता नितीश कुमार यांच्‍या प्रयत्‍नांना कितपत यश येईल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news