

पुढारी ऑनलाईन डेस्क : CSK Ben Stokes : इंडियन प्रीमियर लीग 2023 सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्ज (CSK)साठी पुन्हा एक वाईट बातमी आली आहे. अष्टपैलू काइल जेमीसन बाहेर पडल्यानंतर आता संघाचा भावी कर्णधार मानला जाणारा बेन स्टोक्स आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांना मुकणार आहे. आयर्लंडविरुद्धची एकमेव कसोटी आणि अॅशेस मालिकेच्या तयारीसाठी तो आयपीएलच्या अंतिम टप्प्यात खेळताना दिसणार नाही.
इंग्लंडचा कसोटी कर्णधार स्टोक्सने स्वतःला आयपीएल 2023 च्या अंतिम टप्प्यातून वगळण्याचा खुलासा केला आहे. जेव्हा स्टोक्सला विचारण्यात आले की तो आयर्लंडविरुद्ध कसोटी खेळणार का? यावर त्याने 'हो, मी खेळणार आहे. हा सामना खेळण्यासाठी मी स्वत:ला पुरेसा वेळ देईन,' असे सांगितले. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी त्याने याची पुष्टी केली आहे.
चेन्नई सुपर किंग्सने स्टोक्सला 16.25 कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्याला सीएसकेचा भावी कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. पण तो आता अगामी आयपीएलमधील प्लेऑफचे सामने खेळू शकणार नाही. यामुळे धोनीच्या संघाला त्याची जागा भरून काढण्यासाठी नवा खेळाडू शोधावा लागणार आहे. (CSK Ben Stokes)