

चिकोडी : लग्न सोहळ्यातील जेवणातून विषबाधा झाल्याने सुमारे ८५ हून अधिक जण अत्यवस्थ आहेत. ही घटना चिकोडी तालुक्यातील हिरेकोडी येथे घडली. यातील अनेक जणांनी प्रकृती गंभीर असल्याने ६५ रुग्णांना चिकोडी सरकारी इस्पितळात तर मिरजसह अन्य ठिकाणी खासगी इस्पितळात दाखल केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील हिरेकोडी येथे सोमवारी सायंकाळी झाकीर पटेल यांच्या मुलीचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यास हिरेकोडी गावासह , मिरज व इतर गावातील नातेवाईक उपस्थित होते. जेवण आटपून नातेवाईक आपआपल्या घरी परतले. दरम्यान, त्यांना आज सकाळी उलटी व जुलाब व पोटदुखीचा त्रास सुरू झाला. ६७ जणांवर चिकोडी सरकारी इस्पितळात उपचार सुरू आहेत. तर काही जणांना सदलगा व एकसंबा येथे दाखल करण्यात आले आहे.
हिरेकोडी येथील लग्नाला मिरज येथील पाहुणे मंडळी आले होते. मिरज येथे त्यांना आज सकाळी त्रास सुरू झाल्याने मिरज येथील खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. हिरेकोडी गावाला डीवायएसपी गोपालकृष्ण गौडर यांनी भेट देऊन रूग्णांची विचारपूस केली.
तर चिकोडी सरकारी इस्पितळास आमदार गणेश हुक्केरी यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. रूग्णांची विचारपूस करून डॉक्टरांना योग्य उपचार करण्याच्या सूचना केल्या.
हेही वाचा