

बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा भारताच्या महत्त्वाकांक्षी मंगळ मोहिमेतील मंगळयानाचे सुटे भाग बेळगावात बनले होतेच. आता 14 जुलैरोजी अवकाशात झेपावलेल्या चांद्रयान-3चेही काही सुटे भाग बेळगावात बनल्याचे स्पष्ट झाले आहे. बेळगावच्या उद्योग जगतासाठी हा अभिमानाचा विषय असून, बेळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात हा मानाचा तुरा मानला जात आहे.
इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स (संवेदक), बहुस्तरीय व्हॉल्व, बहुस्तरीय ब्लॉक, स्पूल्स (गडगडे) आदि भाग बेळगावच्या सर्वो कंट्रोल्स कंपनीमध्ये बनलेले आहेत. ते चांद्रयानात वापरले गेले आहेत. सर्वो कंट्रोल्स एरोस्पेस नावाने ही उपकंपनी कार्यरत असून, ती भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) उपग्रहांचेही सुटे भाग बनवते. गेली 15 वर्षे सर्वो कंट्रोल्स इस्रोसाठी कार्यरत आहे.
2014 मध्ये भारताने मंगळाकडे यान पाठवले. त्या यानात बेळगावच्या सर्वो एरोस्पेसने बनवलेले स्थलदर्शक संवेदक (पोझिशन सेन्सर) वापरण्यात आले होते. त्या यशानंतर संवेदक बनवण्याची महत्त्वाची जबाबदारी इस्रोकडून सर्वो कंट्रोल्सला दिली जाते. 14 जुलैरोजी भारताने चंद्राच्या दिशेने यान पाठवले. या चांद्रयान-3 मध्ये सर्वो एरोस्पेसने बनवलेले संवेदकांसह इतर भाग वापरण्यात आले आहेत. सुट्या भागांचे डिझाईन (आरेखन) इस्रोने पुरवलेले होते. त्या आरेखनानुसारच सुटे भाग बनवण्याची जबाबदारी सर्वोवर होती. त्यासाठी भारतीय आणि विदेशी अशा दोन्ही तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. भविष्यात असे भाग पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करूनच बनवता येऊ शकतील, असा विश्वास सर्वो कंट्रोल्सचे व्यवस्थापकीय संचालक दीपक धडोती यांनी व्यक्त केला.
मंगळयानानंतर चांद्रयान-3 मोहिमेचा भाग बनता आले, याचा आनंद आहे. गेल्या वेळी सॉफ्टवेअरमधील बिघाडामुळे चांद्रमोहिमेत अडथळा आला होता. आता सॉफ्टवेअरमधील दोष दूर करण्यात आले आहेत. बेळगावात चांद्रयानाचे हार्डवेअर बनले आहे. हा सर्वो कंट्रोल्ससाठी तसेच पूर्ण एमएसएमई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) उद्योग जगतासाठी हा अभिमानाचा विषय आहे.
-दीपक धडोती, व्यवस्थापकीय संचालक, सर्वो कंट्रोल्स, बेळगाव.